आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2,829 विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - राज्यात टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झालेल्या गावांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यात येणार असून, जिल्ह्यातील दहावी आणि बारावीच्या 2,829 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे एकूण साडेआठ लाख रुपये माफ होणार आहेत. सवलतीस पात्र विद्यार्थ्यांचा अहवाल नुकताच शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालकांकडे पाठवला आहे.
गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यातील 116 गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली होती. टंचाईच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार्‍या सवलतीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची तरतूद आहे. त्यानुसार उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचे वार्षिक शुल्क माफ होणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने याबाबत अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे (लातूर) पाठवला आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी 225 रुपये आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी 255 रुपये भरले होते. शासनाकडून हे शुल्क डीडीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना परत मिळणार आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील इयत्ता दहावीच्या 1892 तर तुळजापूर तालुक्यातील 706 विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. तसेच इयत्ता बारावीतील उस्मानाबाद तालुक्यात 102, तुळजापूर तालुक्यातील 119 विद्यार्थ्यांंची परीक्षा फी परत मिळणार आहे. शासन नियमाप्रमाणे टंचाईग्रस्त उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेचे शुल्क माफ करण्यात येणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे जिल्ह्यातील सवलतीस पात्र विद्यार्थ्यांचा प्रस्ताव पाठवला आहे.’’ व्ही. के. खांडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक).