आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठापुढे आव्हान परीक्षा घेण्याचे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने अखेर शासन आदेश शिरोधार्य मानून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी पावले उचलली आहेत. मात्र, बहुसंख्य प्राध्यापक असहकार्याच्या भूमिकेत असल्याने परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्रांवरील कामकाज आदींबाबत उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करण्याचे आणि एकूणच परीक्षाचे व्यवस्थापन सांभाळण्याचे मोठे आव्हान विद्यापीठासमोर आहे. परीक्षांचा दर्जा टिकवण्याचाही प्रश्न आहेच.

सोलापूर विद्यापीठाची सद्य:स्थिती पाहिली तर 675 प्राध्यापक असहकाराच्या भूमिकेत आहेत. तर परीक्षा कामासाठी 483 प्राध्यापक उपलब्ध होऊ शकतील. विद्यापीठाच्या साधारणत: 50 केंद्रांवर परीक्षा आयोजिल्या जातात. याचा अर्थ उपलब्ध प्राध्यापकांच्या साह्याने परीक्षा सुरळीत पार पडू शकतात. तसा विद्यापीठालाही विश्वास वाटतो. पण, प्रत्यक्षातील चित्र पाहता विद्यापीठाला ती कसरत पार पाडावी लागणार आहे.

प्राध्यापकांच्या महत्त्वपूर्ण अशा 13 मागण्या आहेत. त्यातील दोन मागण्या आर्थिक प्रश्नांशी निगडित आहेत. त्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असे स्पष्ट होत आहे. यासाठी दरवर्षी हे प्राध्यापक बहिष्कार अस्त्राचा वापर करत आहेत. संपाचा दुसरा भाग या वर्षी सुरू आहे, त्याला परीक्षा कामकाजास असहकार आंदोलन असे प्राध्यापक मंडळींकडूनच म्हटले जात आहे. त्यामुळे संपानंतरही परीक्षा घेण्याचे धाडस विद्यापीठांनी केले आहे. दुसरीकडे विद्यार्थी संघटना यावर्षी थंडावलेल्या आहेत.

मागील वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्राध्यापकांना विरोध केला होता. यावर्षी प्राध्यापक संघटनेला विरोध करण्यापेक्ष़्ा सरकारचा निषेध करणे ही सोयीची भूमिका घेतली आहे. इतर विद्यार्थी संघटनांनी तर कोणतीही भूमिका न मांडणे योग्य समजले आहे. शासन आदेश देईल त्याप्रमाणे काम करण्याची भूमिका विद्यापीठाने स्वीकारली आहे. अखेर 5 एप्रिलपासून विद्यापीठाने प्रारंभी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या, नंतर 12 एप्रिलपासून पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्याचा मध्यम मार्ग विद्यापीठाने स्वीकारला. तोपर्यंत प्राध्यापकांचा संप मिटेल, अशी आशा ते बाळगून आहेत.


असहकार आंदोलनाचा 52 वा दिवस
राज्यातील प्राध्यापकांनी 4 फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजाबाबत असहकार आंदोलन छेडले आहे. या निर्णयाला आज तब्बल 52 दिवस पूर्ण झाले आहेत. मागील वर्षी प्राध्यापकांनी 22 मार्चपासून तब्बल 58 दिवस उत्तरपत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकला होता. तर यंदा 4 फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावरच बहिष्कार टाकला गेला आहे. मागण्या त्याच आहेत, आंदोलनाची भाषाही कायम आहे. यंदाही ठोस तोडगा नाही निघाला तर पुढील वर्षीही हेच होणार.


शासनाने तोडगा काढावा
प्राध्यापकांच्या मागण्या रास्त आहेत, शासनाने त्या मान्य करून तातडीने तोडगा काढावा. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.’’ युवराज माळगे, महानगर मंत्री, अभाविप


प्राचार्यांच्या सहकार्याने परीक्षा
शासन आदेशानुसार विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्राचार्यांच्या सहकार्यांने या परीक्षा 5 एप्रिलपासून होतील.’’ डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू


अनुभवी प्राध्यापकांशिवाय परीक्षा होतील कशा ?
परीक्षा कामासाठी अनुभवी प्राध्यापकांची गरज असते. ज्यांना परीक्षा कामकाजांचा अनुभव नाही अशांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुव्यवस्थित होतील कशा? जोपर्यंत प्राध्यापकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत परीक्षा कामकाजाबाबत असहकार आंदोलनात प्राध्यापक सहभागी असतील.’’ प्रा. एस. के. मठपती, सुटा समन्वयक, सोलापूर विद्यापीठ