आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. लहानेंच्या मातृगाथेने भारावले सोलापूरकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पृथ्वीतलावर देव नक्कीच आहेत. त्यांचा दूत म्हणजेच आई. आपल्या लेकरांवर तीच सर्वात जास्त प्रेम करते. आईबद्दलच्या या भावना व्यक्त केल्या आहेत, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी. लाखांच्या वर नेत्रशस्त्रक्रिया करून विक्रम करणार्‍या डॉ. लहाने यांनी आईच्या कथा सांगून सोलापूरकरांना भारावून टाकले.

डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी साहित्य आणि समाजसेवा पुरस्कारांचे वितरण झाले. ज्येष्ठ समीक्षक प्रा. निशिकांत ठकार यांना साहित्यसेवा तर डॉ. लहाने यांना समाजसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.

मोठय़ा संख्येने नेत्रशस्त्रक्रिया करण्यामागचा उद्देश डॉ. लहाने यांनी कथन केला. ‘त्यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले होते. डॉक्टरांनी आयुर्विमा उतरवण्याचा सल्ला दिला. जून 1994 मध्ये मृत्यूची तारीख दिली होती. पत्नी, मुला-बाळांच्या भवितव्यासाठी आयुर्विमा उतरून मृत्यूची वाट पाहात होतो. परंतु, देवदूत म्हणून आईच धावून आली. तिने स्वत:चे मूत्रपिंड दिले. 95 मध्ये शस्त्रक्रिया झाली. पोटावरची दुखरी बाजू घेऊन तिने मला पाहण्याची धडपड केली. मला पाहिल्यानंतरच तिचे दुखणे कमी झाले. आईचे हे ऋण फेडण्यासाठी नेत्रशस्त्रक्रिया सुरू केल्या,’ असे ते म्हणाले. या वेळी डॉ. लहाने यांनी आपल्या जीवनातील अनेक हृदयस्पशी अनुभव कथन केले.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, डॉ. मीर इसहाक शेख, बाबूराव मैंदर्गीकर, दत्ता गायकवाड, प्रा. विलास बेत, रविकिरण पोरे, महेश कोठे, नागेश सुरवसे, कल्याणराव हिप्परगी व्यासपीठावर होते. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डोळा-साहित्य एकच
डोळा आणि साहित्य हे काही वेगळे नाही. शब्दांना सौंदर्य आणि कारुण्य देणारे साहित्यिक आणि डोळ्यांनी पाहून समाज निरखणारे आणि त्याबद्दल बोलणारे एकच असतात. वारकरी ज्या गोष्टी सांगतो तेही साहित्यच असते. अशा साहित्यातून नव्या प्रेरणा मिळाव्यात, युवक पेटून उठावा आणि सामाजिक क्रांती व्हावी.’’ सुशीलकुमार शिंदे, गृहमंत्री
..तर समाज भ्रष्ट होतो

डॉ. निर्मलकुमार फडकुले भाषेवर प्रेम करत होते. संत साहित्याच्या अभ्यासाने त्यांनी समाजधर्म, मानवधर्म सांगितला. भाषेचे गुण संपादित करून प्रभावीपणे प्रबोधनाचे विचार मांडले. त्यांच्या विचारांवर चालताना भाषा जपली पाहिजे. भाषा भ्रष्ट झाली तर समाज भ्रष्ट होईल, असे समजावे.’’ प्रा. निशिकांत ठकार, ज्येष्ठ समीक्षक

धन्यवाद तात्यासाहेब!
निर्मलकुमार फडकुले सभागृहात शिंदेंचे रविवारी पहिलेच भाषण झाले. 18 डिसेंबर 2012 रोजी या सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. त्या दिवशी शिंदे सोलापुरात होते. परंतु दिल्लीतल्या अत्याचारात ‘निर्भया’चा त्याच दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे ते सभागृहाकडे येऊ शकले नव्हते. रविवारी सभागृह पाहून त्यांनी र्शी. कोठे यांचे अभिनंदन केले. ‘‘धन्यवाद तात्यासाहेब. या सभागृहात आता साहित्य, काव्य, संस्कृतीचे कार्यक्रम होऊ द्या!!’’ असे ते म्हणाले.