आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2784 रुग्णांची नेत्रतपासणी, 541 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रियेविना अंधकारमय जीवन जगणार्‍या सर्वसामान्यांच्या जीवनात प्रकाश पडावा यासाठी कुंभारी येथील अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज अँन्ड हॉस्पिटलच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व भिंगोरोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात 2784 तपासणी रविवारी पूर्ण झाली. याला गरीब व गरजू रुग्णांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आता 2, 3 व 4 सप्टेंबर रोजी सलग तीन दिवस प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ पद्र्मशी डॉ. तात्याराव लहाने हे शस्त्रक्रिया करणार आहेत.

कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात रविवारी सकाळी सात वाजता उद्घाटनाची औपचारिकता न करता रुग्णांची तपासणी सुरू झाली. या वेळी रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त किरीटभाई पटेल, मेहूल पटेल, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ. राजेंद्र घुली, डॉ.सत्येश्वर पाटील, डॉ.सिध्देश्वर करजखेडे, डॉ. मंजूनाथ पाटील, डॉ. माधवी रायते आदींची प्रमुख उपस्थिती होती. या तपासणीतून शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड करण्यात आली. आता या रुग्णांवर सोमवारपासून शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या दोन दिवसांत शस्त्रक्रियेसाठी 541 रुग्ण दाखल झाले आहेत. रविवारी सकाळपासून रुग्णांची गर्दी सुरू होती. परगावच्या रुग्णांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराचा समारोप बुधवारी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती वसंत पुरके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याच कार्यक्रमात संस्थेचा वर्धापनदिन होत आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर होत आहे.

माझ्या पतीच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही आळंदवरून आलो. दहा हजार खर्च करण्याची आमची ऐपत नाही. आम्हाला येथील मोफत शस्त्रक्रियाबाबत समजले आणि आम्ही आलो. येथील सुविधा उत्तम आहे.’’ मंगलाबाई संगा, नातेवाइक

सेवेतून आत्मिक समाधान
दुसर्‍यांचा विचार केल्यास माणूस स्वत:ला विसरतो. आवड असणार्‍या कामाचा कधीच कंटाळा येत नाही. शेतकरी कुटुंबातील असल्याने ग्रामिण भागाच्या परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे गरीब जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला. अखेरच्या श्वासापर्यंत सेवा चालू राहील. या कामातून आत्मिक समाधान मिळते.’’ डॉ. तात्याराव लहाने, नेत्ररोग तज्ज्ञ

लहाने एक आदर्श गुरू
डॉ. लहाने यांनी आदर्श निर्माण केला आहे. गेल्या 22 वर्षांपासून मी रुग्णांची सेवा करीत आहे. आरोग्याची पर्वा न करता ते सेवा करतात. ते माझे आदर्श आहेत ’’ डॉ. रागिणी पारेख

शिबिराचे योग्य नियोजन
डॉ. तात्याराव लहाने यांच्याबरोबर मुंबईहून 25 जणांची टीम आली. तसेच, ग्रामीण भागातील रुग्णांच्या सोयीसाठी अश्विनी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, फिजीशियन, टेक्निशियन, नर्सेस, वाहन व्यवस्था आदीसाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. जंतू संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे.

1 लाख 30 हजार शस्त्रक्रिया
डॉ. लहाने यांनी 473 शिबिरातून 1 लाख 30 हजार रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया केल्या. दोन वर्षांपूर्वी लहाने यांना किडनीचा त्रास झाला. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली. गर्दीपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, ते आजही सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत न थांबता शस्त्रक्रिया करतात.