आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेदांच्या पलीकडे जा, प्रेम दाखवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ज्या जातीत जन्म होतो, ती जात जन्मभर चिकटून असते. साहित्यिकांनी त्याच्या पलीकडे जाऊन जगाला प्रेम दाखवावे, असे सासवड येथे होणार्‍या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष कवी फ. मुं. शिंदे रविवारी येथे म्हणाले.

बालसाहित्यकार गोविंद गोडबोले यांना ‘श्रीनिवास रायते बालसाहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाखा अध्यक्ष डॉ. वासुदेव रायते, कार्याध्यक्षा सायली जोशी, नारायण कुलकर्णी, गिरीश दुनाखे मंचावर होते. इंडियन मॉडेल स्कूलच्या सभागृहात कार्यक्रम झाला.

शिंदे पुढे म्हणाले, ‘‘पाठमोरा माणूस आणि पाठकोरा कागद जो वाचतो, तोच खरा साहित्यिक असतो. अशा माणसाच्या अंगी माणसे पारखण्याची ताकद असते. त्याच्या हातून कसदार लेखन होते. अशा लेखकांची मराठी साहित्याला गरज आहे.’’ गोडबोले यांना मानपत्र देऊन या वेळी गौरव करण्यात आला. प्रशांत जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

अध्यक्षांच्या प्रतीक्षेत गेले तब्बल चार तास
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर शिंदे यांचे सोलापुरात रविवारी पहिल्यांदाच आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी सोलापुरातील साहित्य रसिक मंडळी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रतीक्षेत होते. परंतु, उस्मानाबाद येथील कार्यक्रम आटोपून त्यांना यायला रात्रीचे आठ वाजले. इकडे वाट पाहून गोडबोले यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मनोगत झाले. कार्यक्रम संपला आणि शिंदेंचे आगमन झाले. त्यावेळी गोडबोलेंना मानपत्र देण्याचा कार्यक्रम झाला.

.. तर साहित्य वाढेल
गोडबोले यांनी घरातील संवाद संपत असल्याची खंत व्यक्त केली. आई-बाबा मुलांबरोबर किती वेळ बोलतात. मुलांना तरी टीव्ही, लॅपटॉप, मोबाइल सोडून कुणाशी बोलायला वेळ कुठे आहे? अशा जीवनशैलीमुळे वाचनसंस्कृती कमी होत चालल्यामुळे साहित्य कमी पडू लागले. संवाद वाढला तर साहित्याला चांगले दिवस येतील, असे ते म्हणाले.