आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रमाग कामगारांचा मोर्चा, आजपासून बेमुदत उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - किमान वेतनाच्या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांनी सोमवारी तिसर्‍या दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयापासून सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला. त्यानंतर तिथे बैठक झाली. परंतु, तोडगा िनघू शकला नाही. त्यामुळे कामगारांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. अक्कलकोट रस्त्यावरील एमआयडीसीत असलेल्या यंत्रमाग भवनसमोर या आंदोलनास सुरुवात होईल. निर्णय होईपर्यंत अन्नत्याग करण्याचा निर्णय १३ कामगारांनी जाहीर केला.

राज्य शासनाने तब्बल २० वर्षांनी कामगारांसाठी किमान वेतन देण्याची अधिसूचना काढली. तासांसाठी ११ हजार १७३ रुपये हे वेतन असावे, असे अधिसूचनेत म्हटले आहे. परंतु कारखानदारांनी परवडत नसल्याचे कारण पुढे करून चालढकल सुरू केली. त्याच्या विरोधात जिल्हा यंत्रमाग कामगार संघटना आणि मनसेप्रणित कामगार संघाने गेल्या तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले. सोमवारी सकाळी कामगार मोर्चाने सहायक कामगार आयुक्त कार्यालयात आले. त्यानंतर बैठक झाली. प्रभारी सहायक कामगार आयुक्त बी. आर. देशमुख यांच्यासमोर कामगार आणि कारखानदार बसले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर श्री. देशमुख यांनी शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन देण्याची सूचना केलेली सूचना कारखानदारांनी अमान्य केली.

बेमुदत उपोषण करणार
किमान वेतन देण्याचा निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. पहिल्या दिवशी १३ कामगार बेमुदत उपोषणाला सुरुवात करतील. त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर कामगार सहभागी होतील. अशा पद्धतीने हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करू श्रीधर गुडेली, मनसे प्रणित कामगार सेना
... अन्यथा खटले भरणार
किमान वेतन देण्यासाठी राज्य शासनाने २९ जानेवारीला अधिसूचना काढली. त्याप्रमाणे कारखानदारांनी वेतन देणे भागच आहे. जे कारखानदार देणार नाहीत, त्यांच्यावर खटले दाखल करण्याची मोहीमच हाती घ्यावी लागेल. बी.आर. देशमुख, प्रभारी सहायक कामगार आयुक्त

सहा. कामगार आयुक्तांना कारखानदार जुमानेनात
कामगारांच्याआंदोलनाने अक्कलकोट रस्त्यावरील एमआयडीसी परिसरात आैद्योगिक अशांतता निर्माण झाली. सहायक कामगार आयुक्त बी. आर. देशमुख यांनी किमान वेतन अंमलबजावणीची सूचना करून ही कारखानदार जुमानेनात. त्यामुळे कामगारांतील असंतोष कधीही उफाळू शकेल, अशी स्फोटक स्थिती आहे. आंदोलनामुळे कामगारांची आठवड्याची मजुरी बुडाली. आता उपोषणाने त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यास अनुचित प्रकार घडेल.

किमान वेतनाच्या मागणीसाठी जिल्हा यंत्रमाग कामगार संघटना मनसेप्रणित कामगार संघटनांनी सोमवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात शेकडो कामगारांनी हजेरी लावत न्याय्य हक्काचा लढा अधिक तीव्र केला.