आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हॅलेंटाइन डे’साठी ‘फँड्री’ची खास भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - यंदाचा व्हॅलेंटाइन डे तरुणाईसाठी खास आहे. कारण याच दिवशी(14 फेब्रुवारी) प्रेमाचा संदेश देणारा फँड्री चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेमी युगुलांसाठी ही खास भेट ठरणार आहे. प्रेमाचा संदेश तसेच समाजातील प्रखर वास्तवता दाखवणारा चित्रपट तरुणाईसह सर्वांना आवडेल, असा विश्वास फँड्रीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.


आपण कितीही पुरोगामी म्हणालो तरी जाती व्यवस्थेच्या चौकटी आजही मजबूत आहेत. या चौकटीत प्रेमाच्या कोमल भावनांचा कायमच बळी जातो. पण, काहीजण वेगळे असतात. ते आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतात. प्रेमाचा निरागस भाव जपतात. आपले प्रेम सत्यात आणण्यासाठी संघर्ष करतात. काहीजण जिंकतात, तर काहीजण गुडघे टेकतात. प्रेम आणि वास्तव याचे फँड्री हा चित्रपट प्रतिनिधीत्व करतो. प्रेमाच्या कोमल भावना, त्याला होणारा विरोध या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


आजही जाती व्यवस्थेच्या चौकटी
फँड्री चित्रपटाचे चित्रिकरण ग्रामीण भागात झाले आहे. चित्रिकरणदरम्यान माझ्यासह चित्रपटातील कलावंतांना जाती व्यवस्थेचा भयानक अनुभव आला. पुरोगामी महाराष्ट्रात जाती व्यवस्थेची मूळे आजही घट्ट असल्याचे दिसून येते. चित्रपट प्रेमाचा संदेश देत असला तरी समाजातील जाती-भेदाचे चित्र समाजात आजही पाहायला मिळते.’’ नागराज मंजुळे, दिग्दर्शक फँड्री

हे आहेत फँड्रीचे किमयागार
कथा, पटकथा संवाद, दिग्दर्शन : नागराज मंजुळे
छायांकन : विक्रम अमलाडी
संगीतकार : आलोकनंद दासगुप्ता
कलावंत : सोमनाथ अवघडे, किशोर कदम, छाया कदम, नागराज मंजुळे, ज्योती सुभाष, रार्जशी खरात


अशी आहे कथा..
छोट्याशा गावात राहणार्‍या एका दलित मुलाची प्रेमकथा फँड्रीत आहे. गावातील एका मुलीवर त्याचे प्रेम जडते. मात्र, आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याला समाजाचा प्रचंड विरोध होतो. प्रेमासाठी तो समाज व्यवस्थेच्या विरोधात उभा राहतो. यातून निर्माण होणारा संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळतो.