आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेचे कर्ज फेडू शकत नसल्याने उपळाईत शेतकऱ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भिमराव गोरे
कुर्डुवाडी - दुग्ध व्यवसायासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने कंटाळून उपळाई खुर्द (ता. माढा) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (दि. २९) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. भिमराव रामचंद्र गोरे (वय ४८, रा. केदार वस्ती, उपळाई खुर्द, ता. माढा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी महेश रामचंद्र गोरे यांनी खबर दिली. त्यावरून माढा पोलिसांत या घटनेची नोंद झाली. भिमराव गोरे यांनी भारतीय स्टेट बँकेच्या माढा शाखेतून दुग्धव्यवसायसाठी ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी त्या कर्जाचे नवे जुने केले होते. दूध व्यवसाय परवडत नसल्याने हे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यामुळे ते िनराश होते. कर्जाला कंटाळून शेतामधील जनावरांच्या गोठ्यातील लोंखडी पाईपला दोरीने गळफास घेऊन भिमराव गोरे यांनी जीवनयात्रा संपवली. घटनेनंतर माढ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे, तालुका कृषी अधिकारी शरद सोनवणे,कृषी सहाय्यक एस. एम. काळेन, कृषी पर्यवेक्षक एच. ए. बोराटे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

भिमराव गोरे यांच्यामागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा उत्तम हा कोल्हापुरात कला शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. तर मुलगी ज्योती हिने यंदा बारावीची परीक्षा दिली आहे.