आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांना प्रतीक्षा मोठ्या पावसाची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - अकलूज व परिसरात गुरुवारी सायंकाळी व रात्री झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रिकाम्या असणाऱ्या एका माळवद घराची पडझड झाली. महाळुंग सर्कलमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ऊस शेती व केळी बागांचे नुकसान झाले. महसूल प्रशासनाच्या वतीने नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे.

गेल्या ३ ते ४ दिवसांपासून वातावरणात कमालीची उष्णता निर्माण झाल्याने उन्हाळ्यातील मे महिन्याप्रमाणे उकाडा जाणवत होता. ४५ मिनिटांच्या झालेल्या पावसाची २ इंच नोंद झाली असून रात्रभर पावसाची रिपरिप झाली आहे. अकलूज शहरातील हनुमान मंदिराजवळील रिकामे माळवदाचे घर पावसात जमीनदोस्त झाले आहे. तर पावसाने शहरातील सखल भागात जागोजागी पाणी साचले होते. परिसरातील माळीनगर, यशवंतनगर, गिरझणीसह महाळुंग मंडलात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक शेतीतील उभे ऊस, मका, कडवळ झोपले गेले असून मंडलातील केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान झाले आहे. जून महिन्यानंतर अकलूज व परिसरात आजपर्यंत झालेल्या पावसाची सुमारे १०.४४ इंच इतकी नोंद झाली असून गुरुवारी झालेल्या पावसाची नोंद २ इंच एवढी आहे. महाळुंग मंडलात महाळुंग, वाघोली, वाफेगाव, लवंग, संगम, नेवरे, माळीनगर, तांबवे, गणेशगाव, बिजवडी आदी भागात वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले. असे असले तरी माळशिरस तालुक्यातील शेतकर्‍याना मोठ्या पावसाची प्रतीक्षाही आहे.
अक्कलकोटला शेतकर्‍याच्या आशा पल्लवीत
अक्कलकोट- तालुक्यामध्ये गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून तासभर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर असलेल्या प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. घामाच्या धारा लागल्या होत्या. सहा वाजण्याच्या सुमारास शहर परिसरात पावसाने तासभर जोरात हजेरी लावली. वारा व मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा तडाखा एवढा मोठा होता की, सर्वत्र पाणी पाणी झाले. तालुक्यात सर्वदूर झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतकर्‍याच्या आशा पल्लवीत झाल्या. दोनच दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. त्यांनतर शुक्रवारी झालेल्या पावसाने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. अद्यापही शेतकर्‍याना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
मंगळवेढ्यात उजनी कॅनाॅलचा भराव वाहून गेला
मंगळवेढा -
बुधवारी झालेल्या पावसाने मंगळवेढा शहरालगत असलेला बायपासजवळील उजनी डी. वाय. क्र. १ मधील कॅनॉलचा भरावा पावसाने वाहून गेला आहे. उजनीचे पाणी येण्याअगोदरच कॅनॉलचा भरावा वाहून गेल्यामुळे उजनीच्या कामकाजाबाबत शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. मंगळवेढा तालुक्यात उजनीची कामे अद्याप पूर्ण झाली नसून निधीअभावी ती अपूर्ण आहेत. मंगळवेढा शहराजवळ डी. वाय. क्र. १ मधील मायनी २ मधील कॅनॉलचा भराव दि. २० ऑगस्ट रोजी मध्यरात्री पडलेल्या पावसाने शेजारच्या शेतामध्ये वाहून गेला आहे. शहरालगत असलेल्या खोमनाळ रस्त्याजवळील पायपासजवळ हा कॅनॉल आहे.