आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोगॅसमुळे बदलली शेतकऱ्यांची जीवनशैली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सातत्याने होणारी इंधनाची दरवाढ, वीज भारनियमनाच्या कटकटीपासून साडेचार हजार कुटुंबाने स्वत:ची सुटका करून घेत पर्यावरणपूरक बायोगॅस संयंत्र बसविले आहेत. त्यामुळे त्या कुटुंबांची जीवनशैली पूर्णपणे बदलली असून त्यांची आर्थिक बचतही झाली आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे बायोगॅस संयंत्र योजना राबवण्यात येते. गेल्या चार वर्षांमध्ये जिल्ह्यातील साडेचार हजार कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे पूर्वी स्वयंपाकासाठी दूरदूरपर्यंत पायपीट करून सरपण गोळा करावे लागत होते. परंतु बायोगॅस प्रकल्प निर्मितीनंतर आता चुलीच्या धुरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या ग्रामीण महिला गॅस शेगडीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. चुलीसमोर बसणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्नही दूर झाला आहे.
बायोगॅस संयंत्रासाठी शासन देते अनुदान
- बायोगॅसला स्वच्छतागृह जोडल्यास एक हजार वाढीव अनुदान
- प्रत्येक बायोगॅससंयंत्रासाठी आठ हजार रुपये अनुदान
- जि.प. सेसफंडातूनप्रत्येकी दीड हजाराचे विशेष अनुदान
बायोगॅस संयंत्र म्हणजे
सेंद्रीय पदार्थांचे बॅक्टेरियाद्वारे हवा विरहित अवस्थेत विघटन होऊन तयार होणारा ज्वलनशील वायू म्हणजे बायोगॅस. नैसर्गिकरीत्या तयार होणारा बायोगॅस हवेत विरून जाण्यापूर्वी पकडण्यासाठी बायोगॅस संयंत्राचा वापर केला जातो.
बायोगॅसचे फायदे
स्वयंपाकासाठी गॅस, प्रकाशासाठी दिवा, शेणाची बचत, सेंद्रीय खताची निर्मिती, शौचालय जोडणीमुळे प्रदूषणाला आळा, संयंत्राद्वारे औषध फवारणी यंत्रे, सिंचनासाठी इंजिन, तीन ते दहा एचपीच्या विद्युत मोटारी चालविता येतात.
2 किलो गॅसची निर्मिती
दोन घनमीटरच्या बायोगॅस संयंत्रात दररोज ५० किलो शेण घातल्यास दोन किलो गॅस तयार होतो. त्याद्वारे घराचा संपूर्ण स्वयंपाक, चार ते सहा विद्युत दिवे लागतात. मोठ्या क्षमतेच्या संयत्राद्वारे डिझेल जनित्र चालविले जाते. तसेच, फळबागांना औषध फवारणी करण्यात येते. गॅस निर्मितीनंतर संयंत्रातून बाहेर पडणाऱ्या शेणाच्या रबडीपासून चांगले कंपोस्ट खत तयार होते. जेऊर (ता. अक्कलकोट) येथे माजी आमदार महादेव पाटील यांच्या शेतातील १० एचपीची विद्युत मोटार बायोगॅसवर चालते.
- राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कुटुंबांची जीवनशैली बदलली आहे. या प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नियमित वापरसाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते.''
उमेश काटे, बायोगॅस प्रकल्प, प्रसिद्धीप्रमुख
- बायोगॅस प्रकल्प उभारण्याअगोदर स्वयंपाक करताना भरपूर त्रास होत होता. गॅस शेगडीवर स्वयंपाक करताना पूर्वीच्या तुलनेत आता काहीच त्रास राहिला नाही. ''
निर्मला साठे, मंद्रूप (दक्षिण सोलापूर)