आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला वाचवताना अंध वडीलही ड्रेनेज खड्डय़ात; सोलापुरात दोघांचाही मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- घरात फुलझाडांची रोपे लावण्यासाठी माती आणायला गेल्यानंतर पाय घसरून मुलगा ड्रेनेजच्या खड्डय़ात पडला. त्याला वाचवताना अंध पित्याचाही बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना विजापूर रस्त्यावरील नूतन प्रशालेजवळील योगीराजेंद्र नगरमध्ये रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. रवींद्र चंद्रकांत डाळजी (वय 34), मुलगा नीरज (वय 8, रा. दोघे योगीराजेंद्र नगर) यांचा मृत्यू झाला. रवींद्र हे जिल्हा परिषद शिक्षण विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कामाला होते. ते अंध होते. मुलगा नीरज हा घराजवळील बालविकास शाळेत चौथीत शिकत होता.

सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी नवीन घर बांधले होते. रविवारी सुटी असल्यामुळे एका कामगाराला सोबत घेऊन घराजवळील पाटीलवस्ती पसिरात माती आणायला मुलासह गेले. घरात त्यांना कुंडीत रोपे लावायची होती. कामगार टोपली भरून माती घेऊन घरी गेला. त्यावेळी नीरज हाही माती भरत होता. मातीच्या ढिगार्‍या शेजारी ड्रेनेसाठी खोदलेल्या पंधरा फूट खोल खड्डय़ात पडला. पावसामुळे त्यात पाणी साचले होते. नीरज पाण्यात पडल्यानंतर आवाज आल्यामुळे आणि पप्पा.पप्पा.. म्हणून ओरडल्यामुळे रवींद्रही त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. माती टाकून कामगार पुन्हा जागेवर आल्यानंतर रवींद्र पाण्यावर तरंगताना आढळले. त्यांनी कॉलनीतील नागरिकांना बोलावून घडलेली दुर्दैवी घटना सांगितली.

पाण्यातून वर काढून पाहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर नेहमीप्रमाणे ते उशिरा आले. तोपर्यंत अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर पाण्यातून मुलाला काढले. त्वरित दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु बापलेकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

रवींद्र चंद्रकांत डाळजी यांच्या पश्चात पत्नी नीलिमा या गृहिणी आहेत. सहा महिन्यांचा निशाद नावाचा मुलगा आहे. विजापूर नाका पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ठेकेदार आणि अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
दृष्टिहीन संघटनेचे सदस्य, नातेवाईक यांनी त्यांच्याकडे संबंधित ठेकेदार व बेजबाबदार अधिकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. लिपिक वर्ग संघटनेचे अध्यक्ष राजेश देशपांडे यांनीही या घटनेला जबाबदार असणार्‍यांवर कारवाईची मागणी केली. शासकीय रुग्णालयात यांच्याशिवाय नगरसेवक शिवलिंग कांबळे, बाबा मिस्त्री, महापालिका साहाय्यक आयुक्त पंकज जावळे, नातेवाइक यांची गर्दी होती.

रवींद्र संगणकात होते मातब्बर
रवींद्र हे 2001 साली कुडरुवाडीत बांधकाम विभागात शिपाई म्हणून कामाला लागले. 2007 मध्ये त्यांची सोलापुरात जिल्हा परिषद शिक्षण विभागात बदली झाली. मागील वर्षभरापूर्वीच त्यांना कनिष्ठ लिपिक म्हणून बढती मिळाली होती. संगणक हाताळण्यात ते मातब्बर होते. बारावी शिक्षण झाले तरी इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. ऑनलाइन बँकिंग, शेअर मार्केट, वीज बीलसुध्दा ऑनलाइन भरायचे. संगणकातील (ब्रेल लिपी पद्धतीने) बोलका संगणक म्हणजे विशिष्ट पध्दतीचे सॉफ्टवेअर वापरून त्यांच्यासाठी खास संगणक होता. त्यावरून ते शासकीय कामे करायचे. ते जिद्दी, हुशार, मनमिळाऊ स्वभावाचे होते अशा आठवणी त्यांचे मित्र सांगत होते. मागील महिन्यातच नीरज याचा वाढदिवस झाला होता.

तातडीची बैठक घेऊ
ड्रेनेजचा खड्डा दोन-तीन महिन्यापूर्वी खोदला होता. तो अद्याप का बुजविण्यात आला नाही याची माहिती घेण्यासाठी सोमवारी तातडीची बैठक घेऊ. परिवाराला मदत करण्यासाठी कार्यवाही करू.
- अलका राठोड, महापौर

परिवाराला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. सोमवारी मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटून अनुकंपा तत्वाखाली डहाळजी यांच्या प}ीला शासकीय सेवेत घेता येते का याबाबत निवेदन देणार आहे.
- दिलीप माने, आमदार

ठेकेदारांवर नाही महापालिकेचे नियंत्रण
ठेकेदारांनी शहरात खोदलेल्या खड्डय़ांभोवती सुरक्षेचे काहीही उपाय केले नाहीत. महापालिका अधिकार्‍यांनीही या धोकादायक खड्डय़ांकडे दुर्लक्ष केले. गेल्या महिन्यात विडी घरकुल येथील खड्डय़ात पडून दोन बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यावरून राजकारणही केले गेले. पण पुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाने काहीच केले नाही.