आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासायनिक खतांना लकेर काळ्याबाजाराची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेल्या काही दिवसांतील रोहिणी, मृग व सध्याच्या आद्र्रा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुष्काळाच्या वणव्याने कोरड्या पडलेल्या विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीत थोडीफार वाढ होत आहे. खरीप हंगामासाठी काही भागांत मशागतव पेरण्याचे काम सुरूआहे. पाणी नसल्याने वाळलेली ऊसशेती पाणी अन् रासायनिक खतांच्या साह्याने फुलवण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. गेल्यावर्षी पाऊस नसल्यामुळे रासायनिक खतांचा फारसा वापर झाला नव्हता. पण यापुढे आणखी खतांची मागणी वाढणार आहे. त्याबाबत कागदपत्रांचे नियोजन कृषी विभागाने केले. दरवर्षी खत नियोजनात तोंडघशी पडणारा कृषी विभाग यंदा तरी त्याबाबत बोध घेणार का? याकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. पावसाप्रमाणेच खतांची मागणी जोर धरत असताना जिल्ह्यातील काही खतविक्रेते याचा फायदा घेत शेतकर्‍यांना अधिक दराने खत, बियाणे विक्री करतात. भविष्यात अडचण निर्माण होण्याच्या भीतीने शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे संपर्क न साधता थेट ‘डीबीस्टार’च्या पुढय़ात तक्रारीचा पाढा वाचला आहे. खतांच्या या अजब ‘उलाढाली’वर हा प्रकाशझोत..

शेतकर्‍यांची फसवणूक
रासायनिक किंवा मिर्श खतांचा मोठय़ा प्रमाणावर काळाबाजार होतो. काही तालुक्यांमध्ये खतांचा अनधिकृत साठा करून त्याची वाढीव दराने विक्री करतात. तसेच दाणेदार खत निर्माण करणार्‍या बोगस कंपन्या ग्रेनचा निकृष्ट दर्जाचा वापर करतात. तर काही कंपन्या वजन वाढवण्यासाठी भेसळ करत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे. दोन वर्षांपूर्वी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वापरण्यात येणार्‍या जीप्सममध्ये चुन्याची भेसळ आढळली होती.

जिल्ह्यातील खरिपाचे सरासरी क्षेत्र
2013 च्या खरीप हंगामातील खत स्थिती (टनात)
2012 च्या खरीप हंगामातील खत स्थिती (टनात)

असे ओळखा चांगले खत
खत पाण्यात टाकावे. ते पाणी दहा मिनिटे सूर्यप्रकाशात ठेवावे. पाण्यावर तेलाचा तवंग आल्यास ते चांगले खत. खत भरडल्यावर हात ओला किंवा तेलकट झाल्यास ते चांगले खत. खताचा भुगा झाल्यास ते बनावट खत समजावे. खर्‍या खताचा दाणा जिभेवर ठेवल्यास टोकावर जिभेला त्रास होतो.

शेतकर्‍यांचा बांधावर खत खरेदीसाठी अल्प प्रतिसाद
खतांच्या विक्रीतील गैरप्रकार थांबवण्यासाठी थेट बांधावर खताचा पुरवठा करण्याचे धोरण शासनाने राबवले. पण, प्रत्यक्षात त्यास शेतकर्‍यांचा अल्प प्रतिसाद आहे. शेतकर्‍यांनी एकत्र येऊन एकाच प्रकारच्या किमान 10 टन खताच्या किमतीचा डीडी काढून कृषी विभागाकडे सादर करावा लागतो. तुलनेने पाऊस कमी असल्याने खताला मागणी कमी असून त्यास प्रतिसादही कमी आहे.

व्यापार्‍यांना बिल देणे कायदेशीर बंधन
बियाणे विक्रेत्यांनी अधिनियम 1983 प्रमाणे विक्री परवाना, विहित मुदतीत नूतनीकरण परवाना दर्शनी भागात लावलेला असावा, साठा व भावफलक ग्राहकांना दिसेल असा लावावा, साठवणुकीचा पत्ता परवान्यात हवा, खरेदी केलेल्या बियाण्यांची बिले द्यावीत. बिलात बियाण्यांचा तपशील, खरेदीदार, पीक, वाण, उत्पादक व लॉट नंबर टाकावा. ग्राहकांच्या खरेदी पावतीवर दुकानदाराची सही व ग्राहकाची सही कायद्याने अपेक्षित आहे. गोदाम किंवा विक्री केंद्रांत मुदतबाह्य बियाणे ठेवल्यास विक्री करता येत नाही असे लिहून ठेवले पाहिजे. बियाण्याचे मूळ वेष्टन फोडलेले नसावे.

अडचणी असल्यास संपर्क साधावा
जिल्ह्यात यंदा खते व बियाणे मुबलक आहेत. खतांचा काळाबाजार, लिंकिंगद्वारे विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम कृषी विभागतर्फे सुरू आहे. गेल्या आठवड्यात सहा दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. गेल्यावर्षी 50 पेक्षा जास्त विक्रेत्यांचे परवाने रद्द झाले होते. सध्या पावसाअभावी खतांची मागणी कमी आहे. पण, भविष्यात मागणी वाढल्यास वाटपाचे नियोजन केले जाईल. अडचणी असल्यास शेतकर्‍यांनी त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा.’’ मदन मुकणे, कृषी विकास अधिकारी

बिलाची मागणी करा
दर महिन्याला ऑनलाइन खते आणि बियाणांचा अहवाल व्यापार्‍यास पाठवावा लागतो. खतांच्या किमती भरमसाट वाढल्यामुळे ग्राहकांचा थंड प्रतिसाद आहे. दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र निम्यापेक्षाही कमी झाल्याने खताला या वेळी मागणी कमी आहे. शेतकर्‍यांनी रासायनिक खते खरेदी केल्यावर पक्क्या बिलाची मागणी केली पाहिजे.’’ उमेश पाटील, अध्यक्ष, फर्टिलायझर्स असोसिएशन