आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Festival Keep Aside , Water Supply Through Tankar

उत्सवाच्या खर्चाला दिला फाटा, टँकरद्वारे पाणीपुरवठा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने यंदा डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती उत्सव साधेपणाने साजरा केला. यानिमित्त मिरवणुकीसह अन्य बाबींवर होणार्‍या खर्चाला फाटा देऊन तालुक्यातील दुष्काळी गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या प्रतिष्ठानकडून दरवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त काढली जाणारी मिरवणूक आकर्षक असते. त्यासाठी डॉल्बी, लेझीम, झांज, ढोलताशांची पथके, कार्यकर्त्यांना टी शर्ट, त्यांची छपाई यावर हजारो रुपयांचा खर्च केला जात होता. मात्र, यंदा दुष्काळी स्थिती असल्याने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डी. राज. सर्वगोड यांच्यासह पदाधिकार्‍यांनी यावर होणारा खर्च टाळून दुष्काळी गावांना पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 14 एप्रिलपासून या मंडळाकडून तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांसह जनावरांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पहिल्या दिवशी मंडळाने 12 हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे रांझणी येथील वनराईसाठी पाणी पुरवले. 15 एप्रिल रोजी दोन खेपा झाल्या. त्यापैकी एक खेप मेंढापूर गावासाठी तर दुसरी खेप तेथीलच जंगलात पाठवली. यामुळे वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली. 16 एप्रिल रोजी भीषण पाणीटंचाई असलेल्या बार्डी येथील वन्यप्राण्यांसाठी व बार्डी येथील गावकर्‍यांसाठी पाण्याची व्यवस्था केली. त्याच दिवशी सायंकाळी शहरातील एका सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. 17 एप्रिल रोजी लक्ष्मीटाकळी, गोपाळपूर, 18 एप्रिल रोजी कोर्टी वाखरी येथे टँकर देण्यात आला. मंडळाने मिरवणुकीसह अन्य खर्च टाळून वाचवलेल्या 40 ते 50 हजार रुपयांमधून हा उपक्रम राबवत असल्याचे मंडळाचे संस्थापक सर्वगोड यांनी सांगितले.

प्रतिष्ठानचा सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार
प्रतिष्ठानची स्थापना 2004 मध्ये झाली. या मंडळाचे पन्नासहून अधिक कार्यकर्ते नेहमी सामाजिक कार्यात सक्रीय असतात. यापूर्वी मंडळाने पूरग्रस्तांसाठी मदतकार्य राबवून लोकांना दिलासा दिला होता. यापुढील काळातही तरुणांसाठी व्यायामशाळा, वाचनालय, सामुदायिक विवाहांचे आयोजन करणार असल्याचे अध्यक्ष सर्वगोड म्हणाले.