आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'देशमुखी डाव'; आयुक्त गुडेवारांची अखेर बदली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एलबीटीवसुली, गाळ्यांच्या लिलावामुळे व्यापा-यांचे टार्गेट बनलेले महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना अखेर आज शासनाने ग्रामीण विकास खात्यात परत बोलावून घेतले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुडेवार यांच्या बदलीसाठी प्रतिष्ठेचा विषय केला होता, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बदलीवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एस. एन. गायकवाड हे नवे महापालिका आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात गाळे लिलावाचा विषय व्यापा-यांनी लावून धरला होता. व्यापा-यांनी पालकमंत्री आणि खासदार शरद बनसोडे यांच्यामार्फत शासनाकडे प्रयत्न केले होते. तरीही गाळे लिलावाला स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे शनिवारी व्यापा-यांनी बंदचा निर्णय घेतला होता.
दरम्यान शुक्रवारी दुपारीच गुडेवार यांच्या बदलीचा निर्णय झाला. काँग्रेसची सत्ता असतानाही गुडेवार यांना सोलापूर महापालिकेचा पदभार सोडण्याचा आदेश मिळाला होता, त्यावेळी गुडेवार यांच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन झाले, न्यायालयाच्या आदेशानंतर गुडेवार सोलापुरात पुन्हा रुजू झाले, तेव्हा स्वागतही जोरात झाले. मात्र आता त्यांनी बदलीला विरोध करायचा नाही,असा निर्णय त्यांनी स्वत: बोलून दाखवला आहे.

शिस्त लावली, रोष ओढवून घेतला
जुलै २०१३ मध्ये रूजू झालेल्या गुडेवारांनी महापालिकेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. तसे त्यांचे काही निर्णय वादग्रस्त बनले होते. एलबीटी वसुली आणि गाळे लिलाव या कारणामुळे व्यापा-यांचा रोष त्यांनी ओढवून घेतला होता. त्यामुळेच शासनाने व्यापा-यांची बाजू घेत गुडेवारांची बदली केली. त्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता, अशी चर्चा आहे.

बदलीचे पत्र मिळाले, त्यांनी पुणे गाठले
शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गुडेवारांना बदलीचे पत्र मिळाले आणि त्यांनी सायंकाळी साडे पाच वाजता आपला पदभार अप्पर आयुक्त विलास ढगे यांच्याकडे सोपवला. आणि लागलीच ते पुण्याकडे रवाना झाले. बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे हे त्यांच्यासमवेत होते.

पुन्हा ग्रामविकास खात्यात
श्री. गुडेवार हे पूर्वी ग्रामविकास खात्यामध्ये कार्यरत होते. त्यामुळे शासनाने त्यांना त्यांच्या मूळ ग्रामविकास खात्याकडे सेवा प्रत्यार्पित केली आणि कामावर रुजू होण्यासाठीच्या सूचना दिल्या. हे पत्र त्यांना मुंबई, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय्य यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले. दुपारी पत्र प्राप्त होताच ते सायंकाळी पदभार श्री. ढगे यांना सोपवून मुंबईला रवाना झाले.