आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर शहरातील टिळक चौकात लागलेल्या आगीत 14 लाखांचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - टिळक चौक परिसरातील वसंत कॅप फॅक्टरी, विजय स्टोअर्स आणि सिद्धेश्वर भेळ हाऊसच्या गोदामाला सकाळी पावणे सातच्या सुमारास आग लागली. त्यात जवळपास चौदा लाखांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिसरातील रहिवासी श्री. शहा यांनी आग लागल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला फोन करून आग लागल्याची खबर दिली. त्यानंतर त्वरित रविवार पेठ अग्निशामक दलाची पहिली गाडी घटनास्थळी दाखल झाली. सलग चार तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली. आग लागली तेव्हा पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे आग नियंत्रित व्हायला मदत झाली.


यांचा माल भस्मसात
वसंत ट्रेडिंग कंपनी, वसंत कारपेट आणि वसंत सेल्स् तसेच मल्लिनाथ कमटमकर स्वामी यांच्या सिद्धेश्वर भेळ हाऊस आणि विश्वनाथ सिद्रामप्पा धरणे यांच्या विजय जनरल स्टोअर्सच्या गोदामातील माल भस्मसात झाला.


नुकसानीचा तपशील
वसंत यांचे क्वायर फोम गाद्या, चटई, काथ्या, फोम, पीयूसी कारपेट, मॅटिंग मटेरीअल, पत्राशेड, वायरिंग, जुने टायर, लाकडांचा स्टॉक, वासे मिळून 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. स्वामी यांचे पत्राशेड, लाकडी रॅक, भांडी, मिक्सर व इतर असे 75 हजार रुपयांचे साहित्य, तर विजय स्टोअर्स यांचे फाइल बोर्ड, पुठ्ठे, बायडिंग मशिनरी, छपाई कागद असे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

10 बंब पाण्याचा मारा
आग लागल्याचा दूरध्वनी येताच अग्निशामक दलाचे जवान बंब घेऊन दाखल झाले. सकाळी सात ते सव्वादहापर्यंत सलग सव्वातीन तास पाण्याचा मारा केला. त्यानंतर आग आटोक्यात आली. केदारनाथ आवटे, अग्निशामक दल अधीक्षक

प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे
परिसरातील काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विजय स्टोअर्सने विजेच्या खांबावरून घेतलेल्या तारेत शार्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या. वसंत यांच्या गोदामात मीटर नसल्याचे मालक विनायक डोईजोडे यांनी सांगितले. 30 ते 35 फूट उंच असणारे हे पत्राशेडचे गोदाम अध्र्या तासाच्या आगीत खाक झाले. पुठ्ठे, गाद्या आणि पाठीमागेच असणार्‍या लाकडाच्या अड्डय़ामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. पावसाची रिमझिम असल्याने आग इतरत्र पसरली नाही.