आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वॉकीटॉकी’वरून होतेय वारीतील आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नातेपुते (पालखी मार्गावरून)- हजारो वारकर्‍यांच्या गर्दीमुळे मोबाइल, दूरध्वनी ही संपर्क यंत्रणा पूर्णत: कोलमडते. आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा एकमेकांशी संपर्क होऊ शकत नाही. परिणामी अधिकारी, कर्मचार्‍यांची दमछाक होते. त्यामुळे पंचायत समिती, आरोग्य विभागाने ‘वॉकीटॉकी’ संच घेतले आहेत. त्याद्वारे दोन्ही पालखी सोहळ्यातील सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या ‘हायटेक’ यंत्रणेमुळे वारकर्‍यांची चांगली सोय होत आहे.

माळशिरस तालुक्यात संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वेगवेगळ्या मार्गाने दाखल होतात. दोन्ही सोहळ्यांमध्ये प्रामुख्याने आरोग्य, पाणीपुरवठा व आपत्कालीन यंत्रणेचे नियोजन करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांची धावपळ उडते. संपर्क यंत्रणा विस्कळीत होत असल्यामुळे एखाद्या आरोग्य केंद्रात औषधे कमी पडल्यास तातडीने दुसरीकडून मागावयची कशी, टँकरचा तुटवडा असल्यास पर्यायी व्यवस्था करण्यासाठी माळशिरस पंचायत समिती व आरोग्य विभागाने स्वतंत्र ‘वॉकीटॉकी’ खरेदी केली. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना एकमेकांशी संपर्क साधणे सुलभ बनले आहे. एकमेकांमधील समन्वयामुळे सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध होत आहेत. ‘वॉकीटॉकी’चे नऊ संच घेतले आहेत. गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, टँकरमध्ये पाणी भरण्याचे केंद्र व आपत्ती व्यवस्थापन केंद्र यांना एकाचवेळी एकमेकांशी संपर्क साधता येते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पाच व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये चार ‘वॉकीटॉकी’ यंत्रे आहेत. एक यंत्र गटविकास अधिकार्‍यांकडे आहे.

जिल्ह्यातील पहिला उपक्रम
‘वॉकीटॉकी’ची संपर्क यंत्रणा स्वतंत्र असल्यामुळे गर्दीचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही. दहा किलोमीटर परिसरात ही यंत्रणा कार्यान्वित आहे. पालखी पुढच्या मुक्कामाला जाताच मागील आरोग्य केंद्रातील ‘वॉकीटॉकी’ संच पुढच्या केंद्रात तातडीने पाठवण्यात येतात. त्यामुळे दोन्ही पालखी सोहळ्यातील नियोजन करण्यास खूप मदत झाली आहे. डॉ. अनिरूद्ध पिंपळे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस