आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाव कोरडे पडल्यामुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूम - एक महिना उलटून गेला तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे बहुतांश तलाव कोरडे पडले असून अनेक तलावात मृत पाणीसाठा आहे. परिणामी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रकल्पातील मत्स्य व्यवसाय धोक्यात आला आहे.

शासनाने भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आताच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. तसेच जनावरांसाठी चारा उपलब्धता नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून भूम तालुक्याला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळयात उन्हाळा अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस कमी झाल्याने गेल्या दोन वर्षात प्रशासनाला धावपळ करावी लागली. तसेच जनावरांसह नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने तलावात समाधानकारक पाणीसाठा झाला नाही. यावर्षी तरी समाधानकारक पाऊस झाल्यावर तलाव तुडूंब भरतील, अशी आशा होती.
मात्र, गतवर्षीचीच परिस्थिती चांगली होती म्हणण्याची वेळ आली आहे. रोहिणी, मृग आणि आर्द्रा नक्षत्र लागोपाठ कोरडे गेल्याने निसर्गाने शेतक-यांच्या आशेची निराशा केली आहे. याचा बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. तसेच तलावावर अवलंबून असलेला मत्स्य व्यवसाय धोक्यात आला आहे. लाखो रुपये गुंतवून तलावात मत्स्य व्यावसायिकांनी शासनाचे कंत्राटाची रक्कम भरून तलावात मत्स्य बिज सोडून त्यांना खाद्य म्हणून पाण्यात पेंड, तांदुळ, मका टाकले आहे. मात्र, मत्स्य मोठे होण्याच्या कालावधीतच काही तलाव कोरडे पडल्याने व काही तलावात मृतसाठा असल्याने मत्स्य मृत होत आहेत. काही पाण्यावर दिसणारे मत्स्य बगळे, डोमकावळे खात असल्याने संस्थेचे आणि व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाजारात माशांच्या किंमती वाढल्या
मच्छी व्यवसाय करणा-या व्यावसायिकांना जवळचे तलाव कोरडे पडल्याने वंजारवाडी, नांदगावसारख्या दूरच्या तलावातून मत्स्य आणावे लागत आहेत. कटला, रोहू, मिरगल हे 100 ते 110 रुपये किलोऐवजी 140 रुपये तर वांबट मासा 200 वरून 250 रुपये प्रतिकिलोने विक्री करावे लागत आहेत. यामध्ये प्रति किलोमागे खर्च वजा जाता 10 ते 15 रुपये उत्पन्न मिळते. शिवाय मोठे मासे नसल्याने ग्राहकांची मागणी घटली आहे. दूरच्या तलावातून माल आणावा लागत असल्याने खर्च अधिक वाढला आहे.
तालुक्यातील महत्त्वाच्या तलावांची स्थिती
तलाव सध्या पाणीसाठा टक्के साठवण क्षमता
बाणगंगा मध्यम प्रकल्प 0.285 दलघमी 5.74 5.935
रामगंगा मध्यम प्रकल्प 0.754 6.136 --
अरसोली लघु प्रकल्प 1.294 16.33 9.231
बागलवाडी लघु प्रकल्प पूर्ण कोरडा 1.567 --
कुंथलगिरी लघु प्रकल्प 0.075 11.36 0.725
गोरमाळा लघु प्रकल्प पूर्ण कोरडा 1.288 --
हिवर्डा लघु प्रकल्प पूर्ण कोरडा 3.634 --
तिंत्रज लघु प्रकल्प पूर्ण कोरडा 1.393 --
जांब लघु प्रकल्प 0.080 (जोत्याखाली) 2.214
नांदगाव साठवण तलाव 0.65 51.18 1.42

जनावरांना चारा मिळेना
यावर्षी सुरुवातीच्या महिन्यातच पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे जनावरांना चाराही झाला नाही. जणावरांना चारा मिळेना झाला आहे. परिणामी अनेक शेतक-यांचा दुग्धव्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शेतक-यांना दूभत्या जणावरांसाठी ओला चारा खरेदी करावा लागत आहे. दररोजच्या खरेदी करण्यात येणा-या चा-याचाही खर्चही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे परवडत नाही. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास अनेक अडचणींना शेतक-यांना सामोरे जावे लागणार आहे. याकडे शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.