आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे सोलापूर शहरात पाच घरे पडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारमुळे शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील सिद्धार्थ नगरात पाच घरे मंगळवारी सकाळी कोसळली. पावसामुळे कुटुंबीय आतल्या खोलीत झोपल्याने जीवितहानी झाली नाही. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे कष्टकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आणखी दोन दिवस पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

कूड आणि मातीपासून बांधलेली घरे पावसामुळे खचलेली होती. कमला विष्णू पोतराज, दशरथ यंजप्पा सज्जन, सुशीला दारगोलू, भीमबाई जतपरी, कुमक्का म्हेत्रे ही मंडळी या घरांचे कुटुंबप्रमुख आहेत. घटनेनंतर प्रभागाचे नगरसेवक ढुंकूनही पाहिले नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते कृष्णाहरी दुस्सा यांनी भेट दिली. महापालिकेकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याची त्यांनी घोषणा केली.

जनजीवन विस्कळित
सोमवारपासून सोलापूरकरांना सूर्यदश्रन नाही. ढगाळ वातावरण, तुरळक सरी आणि गारठा असेच वातावरण होते. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आदी भागांतही पावसाची रिमझिम आहे. संततधामुळे नागरिकांना रेनकोट घालून अथवा छत्री घेऊन बाहेर पडावे लागले. फेरीवाले, भाजीविक्रेते यांचेही हाल झाले.


13.1 मिलिमीटर पाऊस
मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. शालेय विद्यार्थ्यांसह नोकरदारांची तारांबळ उडाली. सखल भागात पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले होते. शहरासह जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 13.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

इथे साचले पाणी
पांजरपोळ, नवी पेठ, बोरामणी नाका, दयानंद कॉलेज, सात रस्ता, विजापूर नाका, बाळीवेस, कोंतम चौक, रेल्वे स्टेशन, जुळे सोलापूर, जिल्हा परिषद, होटगी रोड, विजापूर रोड, रुपाभवानी चौक आदी भागांत खड्डय़ांमध्ये पाणी साचले होते.

शेळगीत 100 घरे स्थलांतरित
शेळगी परिसरातील 100 हून अधिक घरांतील लोकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली. पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने तेथे असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचे स्थलांतर केल्याची माहिती नगरसेवक अविनाश पाटील यांनी दिली. पावसामुळे तेथील घरात पाणी घुसल्याने 15 जणांना शिवदासमय मंगल कार्यालयात हलवण्यात आले.

सर्व रीतसर होईल
राजीव आवास योजनेतून घरे बांधून देण्याची योजना असताना नागरिक तयार होत नाहीत. आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रे आणि वासे दिले. आताही आयुक्त आणि आमदारांना कळवले. सर्व रीतसर आणि नियमानेच होईल. फक्त पैसे द्या म्हणजे आणणार कोठून? अनिता म्हेत्रे, नगरसेविका


पाऊस वाढणार
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता वाढली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. मेधा खोले, उपमहासंचालक, हवामान विभाग