आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेंचे फुलांनी झाले स्वागत, आव्हान पेच सोडवण्याचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे मंगळवारी सोलापूर विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी स्थानिक नेत्यांनी गुलाबाच्या पाकळ्या उधळून स्वागत केले. परंतु, याच वेळी माजी आमदार दिलीप माने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजशेखर शिवदारे यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि महापौर सुशीला आबुटे यांच्या विरोधात नगरसेवकांची स्वाक्षरी मोहीम सुरू झाली. सोलापुरातील काँग्रेसमधील दुफळी दूर करण्याचे काटेरी आव्हान शिंदे यांच्यासमोर निर्माण झाले आहे.

सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापुरात तीन दिवस मुक्काम असून, या कालावधीत ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. काॅग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग येईल. राजशेखर शिवदारे यांच्यावरील अविश्वास ठराव, ज्येष्ठ नेते विष्णूपंत कोठे यांनी ‘घरातील असल्याने वापसीचा प्रश्नच नाही’ असे केलेले विधान याबाबत राजकीय खलबते घडण्याची शक्यता आहे.
महापौर चषक बैठकीसाठी अनेक क्रीडाप्रेमी नगरसेवकांना निमंत्रण दिले नसल्याचे निमित्त साधून महापौर सुशीला आबुटे यांच्याविरोधात नगरसेवकांची स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. स्वाक्षरींचे पत्र शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्याकडे देणार असल्याचे नगरसेवक देवेंद्र भंडारे यांनी सांगितले. मागील २५ वर्षांपासून कबड्डीच्या स्पर्धा भरवतो आणि मी राज्याचा पदाधिकारीही होतो. तरीही महापौरांनी आम्हाला बैठकीसाठी बोलावले नाही, अशी नाराजी भंडारे यांनी व्यक्त केली आहे.

दिलीप माने - राजशेखर शिवदारे वादाकडे लक्ष
मंगळवारीकृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजशेखर शिवदारे यांच्यावर जिल्हाधिका-यांकडे अविश्वास ठराव दाखल झाला. माजी आमदार दिलीप माने शिवदारे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला. काँग्रेसमध्ये उफाळलेला सत्तासंघर्ष शमवण्यासाठी श्री. शिंदे लक्ष घालणार का?