सोलापूर - मराठमोळी लावणी, नजाकतपूर्ण मुजरा, धम्माल ग्रुप डान्स, अफलातून लुंगी डान्स, पिंगपाँगसह विविध जल्लोषी नृत्यांचा नजराणा सादर झाला. रसिकांनी टाळ्या आणि शिट्यांचा प्रतिसाद देत वन्स मोअरचा गजर केला. जनसेवा संघटनेतर्फे आयोजित प्रतापसिंह मोहिते-पाटील सांस्कृतिक महोत्सवास शिवछत्रपती रंगभवन सभागृहात प्रारंभ झाला. सलग पाच दिवस चालणार्या या महोत्सवाच्या पहिलाच दिवशी नृत्य जल्लोषाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
प्रारंभीच तन्वी पालव हिने अफलातून मुजरा कलाप्रकार सादर केला. यात इन्ही लोगोंने .. इन्ही लोगोंने.. ले लिया दुपट्टा मेरा.. पान खाए सैंया हमार.. आदी गीतांचा यात समावेश होता. यानंतर लावणी कलाप्रकारात गिरीजा जोशीने कम्माल सादरीकरण केले. बेबी डॉल, कोल्हापूरसे आयी हूँ.. लुंगी डान्स, कोंबडी नृत्य आदी विविध अशा 17 नृत्य प्रकारांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. स्वप्नील रास्तेंचे बहरदार सूत्रसंचालन कार्यक्रमाला उंची देऊन गेले.
उपस्थितीतील मान्यवर
नगरसेविका मोहिनी पत्की अध्यक्षस्थानी होत्या. रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती राहिली. उद्घाटनाचे सूत्रसंचालन ममता बोल्ली यांनी केले. या वेळी जनसेवा संघटना संयोजन समितीचे अभिराज शिंदे, महेबूब तांबोळी, निखिल सावंत, अय्युब कल्याणी, संजीव मोरे, अजय जंगडेकर, तुकाराम बिराजदार, सुधीर लांडे, मन्सुरअली मकानदार, प्रशांत गायकवाड, ज्ञानेश्वर जन्मले, बिरू मोटे उपस्थित होते.
कॉमन मॅन साठी निर्णय घेतले - आयुक्त गुडेवार
सोलापुरात धडाडीने काम केलेले आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते प्रतापसिंह मोहिते-पाटील सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झाले. नुकतीच त्यांची बदली झाली. सोलापुरातील हा शेवटचा निरोपाचा सांस्कृतिक कार्यक्रम असे सांगून श्री. चंद्रकांत गुडेवार म्हणाले, मला माहीत होते, ज्या फाइलवर मी सही केली ती फाइल माझ्या बदलीस कारणीभूत ठरणार. पण मी सोलापूर महापालिकेचे 50 कोटी रुपये वाचविणार्या एका कामाच्या फाइलवर सही केलेली होती. मी जे निर्णय घेतले ते कॉमन मॅनचा विचार समोर ठेवूनच घेतले. पुन्हा संधी मिळाली तर सोलापूरला येण्यास आवडेल. पक्षीय राजकारणापासून दूर राहून मी केवळ विकासात्मक दृष्टी ठेवूनच कामे करण्याचा प्रयत्न केला.
(फोटो - प्रतापसिंह मोहिते-पाटील सांस्कृतिक महोत्सवात गणेशवंदना सादर करताना कलावंत)