आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खाद्यतेलात भेसळ आलबेल; नागरी जिवाशी होतोय खेळ.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - खाद्यतेलातील भेसळीचा एक उत्तम नमुना सोलापूर शहरात पाहावयास मिळतो. शेंगादाण्याचे दर 80 रुपये किलो असताना, शेंगातेल मात्र विविध भागांत वेगवेगळ्या दराने विकला जातो. चौपाड, बाळीवेस, कुंभार वेस येथे 95 ते 100 रुपये तर शहराच्या पूर्वभागातील गेंट्याल चौक, 70 फूट रस्ता, नीलमनगर येथे 74 रुपये ते 76 रुपये दराने विकले जाते. याबाबत काही उत्पादक आणि विक्रेत्यांना विचारले असता, खाण्याच्या शेंगा आणि तेलासाठी वापरण्यात येणार्‍या शेंगामध्ये फरक असतो, असे उत्तर मिळाले. त्यांच्या उत्तरात ‘आमच्यातील काही जण करतात’ अशी पुष्टीही मिळाली. अन्न व औषध प्रशासनाकडून तेलाचे नियमित नमुने घेतो, प्रयोगशाळेकडे पाठवतो, दोषींवर कारवाई होते, अशी ठरलेलीच उत्तरे मिळाली. उत्पादक, विक्रेते आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्‍या यंत्रणेची ही उत्तरे पाहिल्यास नागरी जिवाशी खेळ करणार्‍या बाबी जाणीवपूर्वक दुर्लक्षित होत आहेत.

तेल गिरण्यांवर संक्रांत
देशात पामतेलाची प्रचंड आवक, खाद्यतेल उत्पादन करणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शिरकाव यामुळे सोलापुरातील 100 तेल गिरण्यांपैकी केवळ 10 सुरू आहेत.

भेसळ म्हणजे नेमके काय?
मलेशिया, इंडोनेशिया येथील पामच्या झाडापासून पामतेलाचे उत्पादन होते. हे तेल स्वस्त दरात देशात आयात केले जाते.
शेंगा, करडई, सूर्यफूल या तेलात पामतेल मिसळून विक्रेते भेसळ करतात. स्वस्तात मिळणारे पामतेल हे आरोग्यास अपायकारक आहे. वापर टाळा.

कायद्यात गरिबांचा विचार कुठाय?
खाद्यतेलाच्या खुल्या विक्रीतून ग्राहकांना तेल पारखून घेण्याचे स्वातंत्र्य आहे. सोलापुरात सुमारे 30 टक्के गरीब जनता दररोज 5 रुपयांचे तेल घेऊन स्वयंपाक उरकून घेणारी आहे. भेसळ प्रतिबंधात्मक कायद्याने त्यांचा विचार केलेला नाही. जाचक अटींमुळे छोटे उत्पादक अडचणीत आले. भेसळ करणार्‍यांवर जरब बसावी, असा कायदा हवा; स्थानिक स्थितीचाही अंदाज घ्यावा. पशुपती माशाळ, उपाध्यक्ष, फाम

रक्तदाब, हृदयरोग वाढणार
खाद्यतेलाचा थेट अन्ननलिकेशी संबंध असतो. उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यानंतर घसा जसा खवखवतो; तसाच भेसळयुक्त तेलाचे परिणाम जाणवतात. घसा दुखतो, खोकला येतो, श्वसनाचे विकार वाढतात. कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्तदाब वाढतो. हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. मेंदूला कमी रक्तपुरवठा झाल्यास पक्षाघात होण्याचीही शक्यता असते. डॉ. विद्याधर सूर्यवंशी, श्वसन विकारांचे तज्ज्ञ

काही लोक करतात.!
विविध भागातील खाद्यतेलांचे दर आणि त्यातील तफावत पाहिल्यास काही लोक करतात. विक्रेत्यांना भावफलक लावून विक्री करण्याची सूचना आम्ही देत असतो. चन्नप्पा कारीमुंगी, अध्यक्ष, खाद्यतेल विक्रेता संघ.

देतो तेच विकले पाहिजे!
शेतकर्‍यांच्या उत्पादित मालावर प्रक्रिया करून तेलउत्पादन होते. त्याची शुद्धता प्रामाण्य मानणार्‍या यंत्रणांकडून तपासली जाते. त्यानंतर किरकोळ विक्रेत्यांकडे हे पोचते. तिथे नेमके काय होते, माहीत नाही. महालिंग परमशेट्टी, अध्यक्ष, ऑइल मिल असो.

आम्ही शुद्ध तेच विकतो
खाद्यतेलाच्या दर्जाबाबत आम्ही कुठलीच तडजोड करत नाही. त्यामुळे तेलाचे दर इतर विक्रेत्यांपेक्षा जादा असतात. शेंगा, करडईचे उत्पादन स्वत: करतो. अभिजित परदेशी, चौपाड येथील विक्रेता