आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नसुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीचा मुहूर्त हुकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून करण्याचा राज्य शासनाने गाजावाजा केला असला तरी शहरातील जेमतेम 25 दुकानांपर्यंतच शासकीय धान्य पोहोचले. इतर दुकानांना धान्यच मिळाले नाही. मोहिमेच्या शुभारंभापुरते निवडक 25 दुकानदारांपर्यंत धान्य पोहोचले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अन्नसुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या पहिल्या दिवशीचा मुहूर्त हुकल्याचे दिसून आले.

शहरातील 4 लाख 52 हजार लोकांना अन्नसुरक्षा विधेयकांतर्गत धान्य उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाने सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 5 किलो धान्य माफक दराने उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. जिल्हा प्रशासनाने या विधेयकाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार असल्याचे सांगत दुकानदारांना वेळेत धान्य उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. मात्र, शनिवारी शहरातील 80 टक्के दुकानदारांनी धान्य उचलले नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

लष्करमधील दुकान क्रमांक 22, 23 ही दुकाने माल नसल्याने बंदच होती. लष्कर नजीकचे दुकान क्रमांक 18 मध्ये मालच नव्हता. गोडावूनमध्ये धान्य आहे, अजून मिळाले नसल्याचे सांगितले. रविवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते शहरातील काही निवडक दुकानांतून नागरिकांना धान्य वाटप करून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.