आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foodgrains Case: Investigate Then File Criminal Charge

कडधान्य प्रकरण : चौकशी करून फौजदारी दाखल करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसाठी पुरवण्यात येणाऱ्या कडधान्याचा विषय शुक्रवारच्या स्थायी सभेत गाजला. वादळी चर्चेनंतर हा विषय नामंजूर करण्यात आला. तसेच हा विषय फेरसादर करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय धान्याच्या दर्जाबाबत चाैकशी करून दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली.

स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या कडधान्याच्या दर्जावरून चांगली खडाजंगी पाहण्यास मिळाली. प्राण्यांना देण्यात येणारे कडधान्याचे दर आणि पुरवठा केलेल्या मालाचे दर यांच्यात तफावत असल्याने स्थायी समिती सभापती पद्माकर काळे, पक्षनेते बाबा मिस्त्री, विरोधी पक्षाचे सुरेश पाटील, चंद्रकांत रमणशेट्टी, आनंद चंदनशिवे यांनी आक्रमक भूमिका घेत प्राण्यांना उच्च प्रतीचे धान्य मिळाले पाहिजे यासाठी आग्रही होते.

नमुने पुणे प्रयोगशाळेकडे
कडधान्याचेनमुने गुरुवारी घेण्यात आले. पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी ते नमुने पाठवण्यात आले आहेत. नमुने तपासून आल्यावर कडधान्याचा दर्जा कळणार आहे.

मांसाहारी मगरीसाठी केली धान्य खरेदी
मगरप्राणी मांसाहारी असून, तो धान्य खात नाही. तरीही १६ मगरांना रोज १०० ग्रॅम ज्वारी, २०० ग्रॅम गहू, २०० ग्रॅम तांदूळ आणि अर्धा किलो मका भरडा हे धान्य दाखवण्यात आले. मगर धान्य खात नाही असा खुलासा मनपा पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. पंकज रापतवार यांनी स्थायीत केला. प्राण्याचा अाहार यादी तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी सुहास लांडगे यांनी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

खरेदीची तीन पाने गायब
प्राणीसंग्रहालयासाठी कडधान्य खरेदी फाइल ३७ पानांची आहे, प्रत्यक्षात ३४ पाने आहेत. मक्तेदारांसोबत आयुक्तांनी केलेले वाटाघाटीसह इतर तीन कागद गायब झाले आहेत. याशिवाय मुख्यलेखापालच्या टिप्पणीनुसार शंका येत असल्याचा आरोप नगरसेवक चंदनशिवे यांनी केला. मक्तेदारांवर फौजदारी करण्याची उपसूचना चंद्रकांत रमणशेट्टी यांनी केली. हा विषय फेरसादर करण्याचे आदेश सभापती पद्माकर काळे यांनी दिले.

दराप्रमाणे धान्य नाही
४०रुपये प्रतिकिलो दराचे धान्य प्राण्यासाठी देणे बंधनकार असताना ते दिले गेले नसल्याचे उपायुक्त म्याकलवार यांनी सांगितले. बाजारात रेशनचे गहू- ७.२० रुपये प्रति किलो तर तांदूळ ९.६० रुपये प्रतिकिलो दर असताना मक्तेदारांकडून गहू २३ तर तांदूळ ४० रुपये दराने खरेदी केल्याचा आरोप नगरसेवक पाटील यांनी केला.

रिंग करून मक्ता
मक्तेदारलक्ष्मी एंटरप्रायजसचे नागेश माळी तर नागेश एंटरप्रायजेसचे शंकर माळी हे पिता-पुत्र आहेत. मक्ता रिंग करून झाल्याचा आरोप यावेळी झाला.