आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Mayor Manohar Sapate And Mahesh Kothe Conflict Issue At Solapur

कोठे-सपाटे यांच्यात रंगले राजकीय वॉर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माजी महापौर मनोहर सपाटे आणि महेश कोठे यांच्यात जलवाहिनी टाकल्यावरून झालेला वाद चांगलाच रंगला आहे. दोन दिवसांपूर्वी निराळेवस्तीत टाकण्यात येणार्‍या जलवाहिनीवरून झालेल्या वादाचे पडसाद आता परस्परांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत गेले आहेत. परंतु या वादात महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांचे बळी जात आहेत.

कोठे सर्मथकावर तलवारीने वार
निराळेवस्ती परिसरात एका तरुणावर जमावाने हल्ला चढवत तलवारीने मारहाण केली. यात किरण पवार नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मार्कंडेय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरसेवक देवेंद्र कोठे यांचे प्रभागातील विकासाची कामे कार्यकर्ते किरण पवार (वय 25, जुनी पोलिस वसाहत) हे पाहतात. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पवार आणि सागर भोसले हे निराळेवस्ती येथे थांबलेले असताना काही जणांनी त्यांच्यावर हल्ला करून तलवार आणि काठय़ाने मारहाण केली. यात पवार यांच्या डोक्यात तलवारीचे वार झाले तर भोसले यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. पवार मार्कंडेय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत रात्री

साडेआठपर्यंत नोंद नव्हती.
परिसरात चर्चा :दोन दिवसांपूर्वी निराळेवस्ती परिसरात जलवाहिनी टाकण्याच्या कामावरून कोठे आणि सपाटे यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन हाणामारीपर्यंत गेल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर होती. मंगळवारी दिनांक 21 जानेवारी रोजी रात्री निराळेवस्ती येथे नवी जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू असताना नगरसेवक देवेंद्र कोठे आणि मनोहर सपाटे यांच्यात वाद झाला होता. तसेच, सपाटे यांनी पालिकेचे अभियंता मादगुंडी यांना मारहाण केली होती. मादगुंडी यांनी काल शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल मनोहर सपाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सपाटेंनीही दिली फिर्याद
मंगळवारी घडलेल्या प्रकारानंतर मनोहर सपाटे यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नगरसेवक महेश कोठे, देवेंद्र कोठे, कनिष्ठ अभियंता देविदास मादगुंडी, मच्छिंद्र डोंगरे, राजू डोंगरे, किरण पवार आणि अन्य 40 ते 50 जणांविरुद्ध शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निराळे वस्ती येथे सुरू असलेल्या जलवाहिनीचे काम पाहण्यासाठी गेलो असता कोठे आणि सर्मथकांनी शिवीगाळ करून अंगावर माती टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे सपाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पालिकेची नाहक बदनामी
महापालिका अधिकार्‍यांना मारहाण करणे आणि त्यांच्या विरोधात फिर्याद देण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे, उपअभियंता व्ही. व्ही. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मादगुंडीवर गुन्हा दाखल झाला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले नगरसेवक अधिकार्‍यांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याने नगरसेवकांची बदनामी होत आहे. यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.

पालिका अधिकार्‍यांचा बळी
जलवाहिनीच्या कामावरून काँग्रेसचे नगरसेवक महेश कोठे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर सपाटे यांच्यात वाद पेटला आहे. बाचाबाची, हाणामारी आणि परस्पर फिर्याद दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण गेले आहे. कोठे सर्मथक किरण पवार यांच्यावर गुरुवारी तलवारीने हल्ला झाला. पण, हे प्रकरण मिटवण्यात आल्याचे नगरसेवक चेतन नरोटे यानी सांगितले. शासकीय कामात अडथळा आणल्याने सपाटे यांच्या विरोधात महापालिकेचे कनिष्ठ अभियंता देवीदास मादगुंडी यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणाची चौकशी होण्यापूर्वी सपाटे यांनी मनपा अधिकारी मादगुंडी यांच्यासह देवेंद्र कोठे, महेश कोठे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. कोठे-सपाटे यांच्या राजकीय संघर्षात मनपा अधिकारी मादगुंडी यांचा बळी गेल्याचे चित्र समोर आला.