आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former Union Home Minister Sushil Kumar, ShindeLatest New In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होय, चुका झाल्या; त्या सुधारतोय-सुशीलकुमार शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘होय, माझ्याकडून चुका झाल्या आहेत; त्या सुधारतोय!,’ अशी स्पष्ट कबुली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ‘एवढय़ात चर्चा करू नका पराभवाची, लढणारे अजून आहेत पुढे-मागे’, या सुरेश भटांच्या काव्यपंक्तींचा आधार घेत शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
श्री. शिंदे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची सारखी चर्चा करत बसू नका. यश अन् अपयश पचवण्याची क्षमता ठेवा. 1980 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी मोठय़ा पराभवानंतरही पक्ष संघटन मजबूत करत मोठे यश मिळवून दिले. काँग्रेसचा तो इतिहास विसरून चालणार नाही.’

या वेळी शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रा. ज्योती वाघमारे, आमदार प्रणिती शिंदे, दिलीप माने, महापालिकेचे सभागृह नेते महेश कोठे, अँड. यू. एन. बेरिया, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सुधीर खरटमल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पायात पाय घालू नका
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे अनेक सल्ले देत शिंदे यांनी गटबाजीपासून लांब राहण्याची सूचना केली. ‘एकमेकांच्या पायात पाय घालून मागील हिशेब चुकते करण्याच्या भानगडीत पडू नका. उणे-दुणे काढत बसल्यास पक्षाचे नुकसान होणार आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत न पोचल्याने त्यांच्याशी संवाद झाला नाही. सर्वांनी आत्मचिंतन करून शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करावा.’
ज्येष्ठांनी बाजूला व्हावे :
‘पक्षामध्ये सर्वांनाच पदं मिळत नसतात. मिळालेले पद हे नाममात्र असते. ज्येष्ठांनी मानपानासाठी आग्रही न राहता थोडेबाजूला सरकून तरुणांना संधी द्यावी. गेल्या निवडणुकीत मीही तीच भूमिका घेण्याचा विचार केला. पण, पक्षाने जबाबदारी दिल्यामुळे ती स्वीकारली,’ असे शिंदे यांनी सांगितले.

पक्ष सोडण्याची भाषा ही तोंडाची वाफ : काहीजण तोंडाची वाफ घालवण्यासाठी फाडफाड बोलतात. पण, त्यांच्या मनात काही नसते. काँग्रेस नेहमीच सर्वांना सामावून घेतो, असे सांगत शिंदे यांनी महेश कोठे यांचे नाव न घेता कानपिचक्या दिल्या. कोठे यांनी पक्ष सोडण्याविषयीची भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते.
सोलापूरकरांना पश्चाताप होईल
शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. येथील खासदार अँड. शरद बनसोडे यांनी शिंदेंची भेट घेऊन मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. सर्वांना शिंदेंचे मार्गदर्शन व सहकार्याची अपेक्षा आहे. सोलापूरकरांनी मात्र त्यांचा पराभव केला. त्याचे जबरदस्त परिणाम सोलापूरकरांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना भोगावे लागतील. सोलापूरकरांना पश्चाताप होईल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके म्हणाले.
यंदाही माझा विजय : दिलीप माने
शिंदेसाहेब गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात असल्याने त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती आहे. सध्या कोण कुठे जाणार याबाबतची चर्चा सुरू असून त्याबाबतच्या बातम्याही येत आहेत. लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारली असून, त्यामध्ये कोण कुठेही जाऊ शकतो. आगामी निवडणुकीतही माझ्यामागे काँग्रेस असल्याने यश निश्चित असल्याचे सांगत आमदार दिलीप माने यांनी आपली उमेदवारी आणि विजय दोन्ही जाहीर केले.
सोशल मीडियावर बंदी हवी
सोशल मीडियामुळे धार्मिक हिंसाचार भडकत असल्याने त्यावर बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री असतानाही आग्रही होतो. येथील मोहसीन शेखला जीव गमवावा लागला. रूपनर गंभीर जखमी झालेत. नवे सरकार सोशल मीडियावर बंदी घालेल, असे शिंदे म्हणाले.