सोलापूर- काँग्रेसच्या सरकारने मंजूर केलेल्या कामांचे उदघाटन करून पंतप्रधान
नरेंद्र मोदी स्वत:ची फुशारकी मारत असून आयजीच्या जीवावर बायजी उधार अशाच पद्धतीने मोदींचा कारभार सुरू आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ पूर्व भागातील पद्मनगर मैदानात आयोजिलेल्या जाहीर सभेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी तेलंगणातील राज्यसभा खासदार रापोलू आनंद भास्कर, बेल्लारी (कर्नाटक) येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. कोंडय्या, माजी खासदार धर्मण्णा सादूल, महापौर सुशीला आबुटे, आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. ज्योती वाघमारे आदी उपस्थित होते. श्री. शिंदे म्हणाले, “केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना मी पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पॉवरग्रीड प्रकल्प आणला. त्याचेच उद््घाटन पंतप्रधान मोदींनी केले.
जातीयवादीना साथ नाही
लक्ष्मीविष्णूचाळीत शुक्रवारी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांनी ज्योतीरादित्य शिंदे यांच्याऐवजी जाहीर सभा घेतली. त्यावेळी माजी मंत्री शिंदे म्हणाले, “काँग्रेसमधील दोन नगरसेवक जातीयवादी पक्षात गेले. काँग्रेस हा सर्वधर्म समभावाच पक्ष असून त्याच विचाराने काम करणाऱ्या आमदारांच्या पाठीशी मतदार राहतील, असेही ते म्हणाले.