आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माळकवठय़ातील चार विद्यार्थिनी अत्यवस्थेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माळकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील पंचाक्षरी माध्यमिक शाळेतील चार विद्यार्थिनींना पोटदुखीचा त्रास होत असल्याने गुरुवारी सकाळी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 18 जुलै रोजी याच प्रशालेतील 135 विद्यार्थ्यांना पोटदुखीच्या कारणामुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लोहयुक्त गोळ्या घेतल्यानेच पोटदुखी होत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. उपचारासाठी दाखल असलेले चारही विद्यार्थी लवंगी येथील रहिवासी आहेत.

राजश्री कल्लण्णा बगले (वय 15), शाहीन शेख (वय 14), भाग्यश्री यशवंत बगले (वय 14), रेणुका संजय बिराजदार (वय 15) अशी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे चार विद्यार्थी गुरुवारी सकाळी बसने माळकवठा येथे शाळेला आले. 8.30 वाजता घरून आणलेले जेवण केले. त्यानंतर हा त्रास सुरू झाला. शिक्षकांनी गावातील खासगी डॉक्टरांकडे व मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयातही प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात हलविले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


त्या गोळ्या देणे बंद केले
सकाळी मुले शाळेत लवकर आली. जेवणानंतर त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मागील महिन्यात झालेल्या घटनेनंतर मुलांना लोहयुक्त गोळ्या बंद केल्या आहेत. शिवानंद यलगोंडे, शिक्षक, पंचाक्षरी माध्यमिक प्रशाला, माळकवठे


त्या गोळ्यांमुळेच पोट दुखतेय
मागील महिन्यात शाळेत दिलेल्या त्या (लोहयुक्त) गोळ्या घेतल्याने मला त्रास झाला. तसाच त्रास आजही झाला. शाळेत जेवण केल्यानंतर पोट दुखू लागले. त्यानंतर शिक्षकांनी उपचारासाठी दाखल केले. त्या गोळ्यांमुळेच पोट दुखत असावे. राजश्री बगले, इयत्ता नववी, पंचाक्षरी माध्यमिक प्रशाला, माळकवठे


रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले
माळकवठे येथील पंचाक्षरी प्रशालेतील पोट दुखत असल्याने दाखल केलेल्या चारही मुलींची प्रकृती उत्तम आहे. तरीही त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही. विद्यार्थ्यांच्या मनाची समजूत झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. डॉ. राहुल मस्तुद, जिल्हा शासकीय रुग्णालय