आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरात दोन दिवसांत चार चोर्‍या, दहा तोळे दागिने लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरात शनिवार, रविवार या दोन दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज गेला आहे. मागील गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसांत 32 तोळे दागिने चोरीस गेले होते. गेल्या चार दिवसांत एकूण अकरा चोर्‍या झाल्या आहेत.

पाच तोळे लंपास
पश्चिम मंगळवारपेठेतील राजेंद्र वर्देकर यांच्या घरात रविवारी चोरी झाल्याचे उघडकीस आले. जोडभावी पोलिसात त्यांनी फिर्याद दिली आहे. 30 मे रोजी राजेंद्र हे लग्न सोहळ्यासाठी पुण्याला गेले होते. 31 मे रोजी पत्नी लग्नासाठी हैदराबादला गेल्या होत्या. 1 जून रोजी चोराने घर बंद असल्याची संधी साधून चोरी केली. एक-एक तोळ्याच्या चार अंगठय़ा, एक तोळ्याची सोनसाखळी, रोख पंधरा हजार रुपये असा कपाटातील ऐवज चोरीस गेला आहे. फौजदार गोरख कुंभार तपास करीत आहेत.

साडेचार तोळे चोरीस
जोडभावीपेठेतील गिरीराज अपार्टमेंटमधील राजेंद्र मार्डीकर यांच्या घरात साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख पाच हजार रुपये चोरीस गेले आहेत. जोडभावी पोलिसात शनिवारी फिर्याद देण्यात आली आहे. मार्डीकर हे बाहेरगावी गेले होते. कडीकोयंडा उचकटून दोन तोळे सोनसाखळी, अर्धा तोळे साखळी, एक तोळे अंगठी, अर्धा तोळे नाणे, अर्धा तोळे कर्णफुले असे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेली आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास जगताप तपास करीत आहेत.

30 हजारांचा ऐवज गायब
सौरभ अपार्टमेंट, होटगी रोड येथील रंजना कोंगनुळीकर यांच्या घरात शनिवारी चोरी झाल्याचे उघडकीस आले. सोने, चांदीचे दागिने, साडेचार हजार रुपये असा एकूण 30 हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे. दोन दिवसांपासून कोंगनुळीकर परिवार कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. कडीकोयंडा उचकटून कपाटातील दागिने, पैसे पळविले आहेत.

मारहाण; पैसे पळवले
मुरारजीपेठ सुराणा मार्केटजवळून पायी जाताना राममूर्ती नायर (रा. तमिळनाडू) यांना तिघा तरुणांनी मारहाण करून मोबाईल, रोख 500 रुपये असा ऐवज पळवला. ही घटना शनिवारी रात्री घडली. फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे.


चोर्‍या व्हायच्याच!
नव्या वर्षात जानेवारी ते मे दरम्यान सत्तरहून अधिक चोर्‍या, घरफोड्या यांचे प्रकार घडले आहेत. मंगळसूत्र हिसकावणे, चालकांना लुबाडणे, दुचाकीच्या डिक्कीतून, काच फोडून कारमधून पैसे, मोबाइल, मौल्यवान वस्तू पळवण्याच्या घटना वाढत आहेत. जणू चोर्‍या या व्हायच्याच, अशी पोलिसांची धारणा होऊ लागली आहे. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या काळात खालावलेला चोर्‍यांचा आलेख पोलिस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांच्या काळात चढलेला सोलापूरकरांनी पाहिला. मात्र, नवे आयुक्त प्रदीप रासकर यांच्या कारकीर्दीत तो आलेख अधिकच उंचावत असल्याचे दिसत आहे. चोर्‍यांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये दहशत आहे. दिवसभर काबाडकष्ट करून शांतपणे झोप घेऊ इच्छिणार्‍या सोलापूरकरांची झोप उडाली आहे.