आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन बँकेत साडेनऊ कोटींचा गैरव्यवहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विसजिर्त अर्जुन नागरी सहकारी बँकेत नऊ कोटी 50 लाख 52 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक सतीश पोकळे यांनी ठेवला आहे. या बाबत बँकेच्या माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना जबाबदार धरले असून, तीन दिवसांत खुलासा करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

संचालक अथवा त्यांच्या नातेवाइकांना कर्जे देण्यास प्रतिबंध असतानाही त्या नियमाचे उल्लंघन झाले. दिलेल्या कर्जांना पुरेसे तारण नाही. परतफेडीत व्याजात नियमबाह्य सवलती आल्या. अशा सर्व बाबींना जबाबदार धरून एकूण 20 जणांना दोषी ठरवले. याबाबत मुदतीत योग्य खुलासा केला नाही तर कलम 34 (संगनमत), 406 (विश्वासघात), 420 (फसवणूक) अन्वये फौजदारी स्वरूपाची कारवाई करू, असे नोटिशीत म्हटले आहे.

कारवाई अटळ
बँकेवर प्रशासकीय मंडळ असताना र्शी. पोकळे त्याचे सदस्य सचिव होते. त्यांनी चाचणी लेखापरीक्षण करून गेल्या वर्षीच दोषींवर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची तयारी केली होती. परंतु त्या वेळच्या जिल्हा उपनिबंधकांनी त्यात खो घातला. त्यामुळे पुढील कारवाईच झाली नाही. विद्यमान जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी मंगळवारी बँकेवरील अवसायक समितीची बैठक घेतली. पुढील कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे दोषींवर आता कारवाई अटळ असल्याचे दिसून येते. प्रत्यक्ष काय कारवाई होईल, हे लवकरच कळेल.

संगनमत, विश्वासघात
बँकेचा एकूणच कारभार पाहिल्यास संचालक आणि व्यवस्थापनाने संगनमत करून ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने बँकेचा परवाना रद्द झाला. आता कारवाई सुरू झाली. सतीश पोकळे, विशेष लेखापरीक्षक (फिरते पथक)

निम्मी रक्कम संचालकांकडेच
संचालक व नातेवाइकांकडे कर्जे : 3 कोटी 67 लाख 86 हजार
विनातारणी कर्जे (असुरक्षित): 3 कोटी 3 लाख 12 हजार
वसुलीत नियमबाह्य सवलत: 2 लाख 97 हजार
नियमबाह्य एकरकमी कर्जफेड : 19 लाख 8 हजार
एक्स्पोजर लिमिटचे उल्लंघन : 2 कोटी 57 लाख 89 हजार
एकूण गैरव्यवहाराची रक्कम : 9 कोटी 50 लाख 92 हजार