आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च दाबाच्या तारेचा शाॅक बसून मित्रास वाचवणा-याचाच मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सागर कोलकुंदी
सोलापूर - आकाशवाणी केंद्र परिसरात बुधवारी नळाला पाणी आले. घरावरील पाण्याची टाकी भरली आहे की नाही पाहण्यासाठी एक तरुण छतावर गेला. घरावरून गेलेल्या उच्चदाब वायरचा त्याला शॉक बसल्यामुळे तो खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांनाही शॉक बसल्याने त्यापैकी एकजण गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमाराला घडली.

मित्राला वाचवण्यासाठी गेल्यानंतर स्वत:चाच जीव गमावण्याची वेळ सागर राजकुमार कोलकुंदी (वय १९, रा. आकाशवाणी केंद्रजवळ) याच्यावर आली. गौरव येमूल (वय १५), अशोक मादगुंडी (वय १८), विश्वनाथ अलकुंटे (वय ३२) हे तिघे जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागरने वालचंद महाविद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. आई गृहिणी असून वडील मोलमजुरीचे काम करतात. तीन बहिणी विवाहित आहेत. अलकुंटे यांच्या घरात ते भाड्याने राहतात. घरावरील टाकीत पाणी पडते की नाही पाहण्यासाठी गौरव छतावर गेला होता. त्यावेळी शॉक लागला. त्याला वाचवताना अशोक आणि विश्वनाथ यांनाही धक्का बसला. सागर हा गौैरवला उचलून बाजूला करताना त्याच्या मानेला वायर लागल्यामुळे तोही बेशुद्ध पडला. उच्च दाबाची वायर घराच्या छतावरून गेली आहे.

अनेकदा निवदेन दिले, काही कार्यवाही नाही
आकाशवाणीकेंद्र परिसरात १९७२ पासून उच्च दाबाची वायर गेली आहे. अनेकांच्या घराच्या छतावरून सहज त्याला हात लागताे. किमान चार-पाच जणांचे यात जीव गेले आहेत. अनेकदा वीज वितरण विभागाला निवेदन दिलेत. पण, वायर काढली नाही. गुरुवारी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.