आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकरी भक्तिरसात जाहले ‘ओलेचिंब’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘माझ्या जिवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी..’ या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी तब्बल 700 किलोमीटर अंतर पार करत शेगावच्या गजानन महाराज पालखीने शुक्रवारी सकाळी शहरात प्रवेश केला. रूपाभवानी रस्त्यावरील पाणी गिरणी चौकात महापौर अलका राठोड यांच्या हस्ते पूजन झाले. पावसाच्या संततधारांनी वारकर्‍यांना चिंब केलेच; त्याची तमा न बाळगता वारकरी भक्तिरसात न्हाऊन गेले होते.

अत्यंत शिस्तबद्ध व नेटके नियोजन असलेल्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे 46 वे वर्ष आहे. तब्बल 33 दिवसांच्या पायी प्रवासानंतर पंढरपुरात पोचणारी आणि सर्वांत लांबून निघणारी ही पालखी आहे. पांढरा सदरा, डोक्यावर टोपी असा वारकर्‍यांचा पेहराव असतो. एकाही महिला वारकर्‍यांचा सहभाग नसणारी ही एकमेव दिंडी आहे. पाठीवर विठूरायाला घेऊन मोठय़ा डौलात निघणारी ‘गजराणी’ या पालखीचे खास वैशिष्ट्य. रूपाभवानी, तुळजापूर वेस, कस्तुरबा मंडई, सम्राट चौकमार्गे वारकर्‍यांनी प्रभाकर महाराज मंदिरात भोजन घेतले. थोड्याशा विर्शांतीनंतर दुपारी दोनला बाळीवेस, चाटीगल्ली, कुंभार वेस, कन्ना चौक, राजेंद्र चौकमार्गे कुचन प्रशालेत मुक्कामी थांबले.

आजचा मुक्काम ‘उपलप’मध्ये
कुचन प्रशालेतील मुक्कामानंतर पालखी शनिवारी सकाळी सहालाच मार्गस्थ होईल. जोडबसवण्णा चौक, पद्मशाली चौक, शासकीय रुग्णालय, बेडर पूल, नळबझार, लष्कर, सातरस्तामार्गे ही पालखी उपलप मंगल कार्यालयात सकाळी अकराला विसावणार आहे. येथे दिवसभराची विर्शांती असून, रविवारी मोदी पोलिस चौकीमार्गे भय्या चौकाकडे व दुपारचे भोजन दमाणीनगर आणि त्यानंतर तिर्‍हेमार्गे पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे.