आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार चालणार्‍या व्हिडिओ सेंटरवर कारवाईसाठी पोलिस तक्रारीच्या प्रतीक्षेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर शहर-जिल्ह्यात व्हिडिओ गेमच्या माध्यमातून सुरू असलेल्या नागरिकांच्या लूटप्रकरणी पोलिस प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले आहेत. ‘दिव्य मराठी’ने डीबी स्टारच्या माध्यमातून 1 फेब्रवारीच्या अंकात या विषयावर प्रकाश टाकला होता. याची दखल घेत या प्रकरणी कोणी तक्रार दिल्यास संबंधितांची तपासणी करून परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले आहे.

शहर-जिल्ह्यामध्ये व्हिडिओ गेम नावाखाली मनोरंजन करणारे गेम सेंटर आहेत. या सेंटरच्या माध्यतातून व्हिडिओ गेम बाजूला ठेवून जुगार खेळला जात होता. या विषयाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने व्हिडिओ गेम सेंटरमध्ये जाऊन सर्वेक्षण केले. तेव्हा याठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आला. या दुकानांमधून मनोरंजन करण्यापेक्षा सरळसरळ पैसे लावून जुगार खेळवला जात असल्याचे उघडकीस आले.

व्हिडिओ सेंटरमध्ये व्हिडिओ गेम खेळताना वेगळीच पध्दत दिसून आली. ग्राहकांनी दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात त्या रकमेचे पॉइंटस् किंवा रिचार्ज करून मशीनवर जुगार खेळण्यास दिला जात होता. बहुधा येथे पैसे हरलेलीच अनेक उदाहरणेही समोर आली आहेत. परंतु कायद्याची माहिती नसल्याने फसगत झालेले आणि पैसे हरलेले ग्राहक कोणत्याही पोलिस चौकीत तक्रार नोंदवत नाही. परंतु इथून पुढे जर अशा संदर्भात फिर्याद दाखल झाली तर संबंधित दुकानाची व सेट करण्यात आलेल्या मशीनची तपासणी करून दोषी चालकाचा दुकान परवानाही रद्द करता येईल, असे पोलिस प्रशासनाने सांगितले.

शहर जिल्ह्यात मिळून नोंदणीकृत 41 व्हिडिओ सेंटर असून यामध्ये 250 पेक्षा जास्त व्हिडीओ मशीन आहेत. एका मशीनवर 50 रुपयांपासून गेम खेळता येतो. आता फसगत झालेली व्यक्ती पुढे येऊन तक्रारी नोंदवतील का? आणि पोलिस प्रशासन कारवाई काय करेल? याकडे लक्ष लागले आहे.