आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाच्या सरी झेलत सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते झाले बेभान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गणरायाच्यास्वागताची शुक्रवारी लगबग होती. काळ्या ढगांनी सूर्यनारायणाला लपवले होते. सकाळी झालेल्या पावसाच्या हलक्या सरींनी बाजारपेठेत धांदल उडाली. भगवे झेंडे, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या पट्ट्या कपाळाला बांधून भक्तगण गणरायाला निरखून पाहात होते. मूर्तीला सजवत होते. ढोल अन् ताशांचा ‘तर्ररा तर्ररा’ आवाज झाला आणि वरुणराजाही जोरदार बरसला. अशा वातावरणात सार्वजनिक मंडळाचा गणपती भिजतच मंडपात गेला.
उत्साहाला उधाण आणणाऱ्या गणेशोत्सवास शुक्रवारपासून सुरवात झाली. गणरायाच्या स्वागताला पाऊसही आल्याने भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आेले चिंब झालेले कार्यकर्ते बेभान होऊन लेझीम खेळत होते. वाहनांच्या टपावर बाप्पांच्या बाजूला बसलेली चिमुकली मंडळी ‘मोरया मोरया’चा जयघोष करत होती. ढोलच्या टपावर पाणी पडल्याने त्याचा आवाज थोडासा क्षीण झाला. पण ताशांच्या तर्ररा तर्रराने कार्यकर्ते शहारून गेले. गुलाल उधळत पावसात न्हाऊन गेले. शहराच्या चारही दिशांतील रस्ते मिरवणुकांनी व्यापले होते. प्रत्येक वाहनावर बाप्पा होते. बाप्पांच्या अंगावर कुणी प्लास्टिक घातले होते तर कुणी छत्री धरली होती. सूर मात्र एकच होता- गणपती बाप्पा मोरया...
गणेशमूर्ती घेण्यासाठी टिळक चौक, बाळीवेस, मधला मारुती, कन्ना चौक ते राजेंद्र चौकपर्यंतचा रस्ता भक्तांनी व्यापून गेला होता. मधला मारुती येथील मिठाई दुकाने सजली होती. ‘जंबो’ मोदक दर्शनी भागात ठेवून भक्तांचे लक्ष वेधण्यात आले होते. भगवे झेंडे, पूजेचे साहित्य विकणाऱ्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटली होती. ढोल-ताशा, ट्राॅली आणि हातगाड्यांना मोठी मागणी होती. ही मंडळीही याच रस्त्यावर बसली होती. दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे त्यांची धांदल उडाली होती.
गणपतीच्या स्वागत मिरवणुकांनी शहराच्या चारही दिशा व्यापून गेल्या होत्या. गणपती बाप्पा मोरयाचा फक्त जयघोष होता. ढोल आिण ताशांच्या आवाजात तरुणाई थिरकली होती. बाप्पाच्या जयघोषात चिमुकली मंडळी न्हाऊन गेली होती. गुलालाची मुक्त उधळण झाली. पावसाच्या सरी झेलत भक्तगण बेभान झाले.