आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदाच्या लगद्यापासून साकारली दगडूशेठची सुंदर गणेशमूर्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आपल्या आराध्यदैवताला भक्त कोणत्या रूपात साकारू शकेल, असे काही सांगता येत नाही. गणेशमूर्तीला तर अनेक रुपात दाखवण्याचा प्रयत्न भक्त करीत असतात. अशा गणेश भक्तांपैकी एक असलेल्या विकास गोसावी यांनी विविध वृत्तपत्रांच्या कागदाचा लगदा तयार करून सगुण गणेशमूर्ती साकारली आहे. पर्यावरणपूरक असलेल्या या मूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.

अशी तयार होते मूर्ती
वृत्तपत्रांचे कागद पाण्यात भिजवा. तिसर्‍या दिवशी मिक्सरमधून बारीक ग्राईंड करून घ्या. त्या मिर्शणात व्हाइटिंग पावडर व खाण्याच्या साबूदाण्याची पावडर अथवा साबूदाण्याचा खळ मिसळा. त्या तिन्ही मिर्शणाला उत्तम मळून घ्या व तो मळलेला गोळा साच्यात टाका. मूर्ती तयार करण्यासाठी किमान एक तास लागतो.


गोसावी यांनी यंदाच्या वर्षी दगडूशेठ, शूर्पकर्ण, सिंहासन व हंसावर विराजमान असलेले गणेश साकारले आहेत.

कुटुंबही रंगलेय मूर्तीकलेत
गोसावी यांच्या या उपक्रमात आई, पत्नी व मुलाचेही सहकार्य मिळत आहे. गोसावी यांनी केलेल्या मूर्तीना रंग देण्याचे काम त्यांचे कुटुंबीय करतात. पापड, कुरड्यासाठी वापरण्यात येणार्‍या रंगाचा वापर या मूर्तीना दिला जातो. शिवाय मूर्ती मोठी असेल तर त्यास पोस्टर कलरने रंग दिले जातात.

अशी सुचली कल्पना
गणरायाचे लहानपणापासून आकर्षण राहिले आहे. लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. तेव्हा कागदाच्या लगद्याचा गणपती तयार करून दिला आणि त्याला प्रथम क्रमांक मिळाला. कागदाची मूर्ती विसजिर्त केल्यानंतर पर्यावरणास काही अपाय झाला नाही.

निसर्ग संवर्धनाचे समाधान
कागदाची मूर्ती तयार करताना वेगळाच आनंद मिळतो.अशा प्रकारच्या वेगळ्या उपक्रमातून काही तरी केल्याचे समाधानही आहे. बाप्पांच्या आशीर्वादामुळे माझ्याकडून हे काम होत आहे. सर्वांनी घरीच अशा प्रकारची गणेशमूर्ती तयार करून निसर्गाचे संवर्धन करावे.’’ विकास गोसावी , कलाशिक्षक