आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 9 कोटी रुपयांचे झाले विसर्जन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दरवर्षीचा गणेशोत्सव वाढत्या महागाईतही ‘महाग’ होत चालला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत तब्बल 9 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. आसरा चौकातील राजा गणपतीच्या महागड्या ऑर्केस्ट्राची त्यात भर पडली, तर मध्यवर्ती मंडळांमध्ये पूर्व भागातील उत्साह सर्वात खर्चिक ठरला आहे.

बुधवारी सोलापुरातील आठ मध्यवर्ती मंडळांच्या अधिपत्याखाली शहरातून मिरवणुका निघाल्या. मिरवणुकीत लेझीम, झांज, डॉल्बी, स्पीकर, ट्रॉली, लेझीम पथकातील मुलांचे ड्रेस यावर मोठा खर्च करावा लागतो. सोलापुरात एकूण 1338 गणेश मंडळांनी गणरायाला निरोप दिला. बहुतेक मंडळांनी छोट्या, मोठय़ा मिरवणुका काढल्या. सर्वात जास्त खर्च वाहन आणि इंधनावरच झाला. मोठय़ा मिरवणुका काढणार्‍या एका मंडळाने कमीत कमी 20 हजार ते 50 हजारापर्यंत खर्च केला. तर राजा गणपतीची मिरवणूक लाखांच्या घरात होती. मिरवणुकीतील वेगवेगळ्या मंडळांच्या खर्चाचा अंदाज घेतला असता नऊही मध्यवर्ती मंडळांच्या मिरवणुकांचा एकूण खर्च 8 कोटी 64 लाखांच्या घरात गेला आहे. पूर्व भागातील मिरवणुका सर्वात महागड्या ठरल्या, या ठिकाणी जवळपास 60 लाखांचा खर्च झाला. होटगी रोड, विजापूर रोडवर जवळपास 40 लाखांच्यावर खर्च झाला तर लोकमान्य, लष्कर व मध्यवर्तीत प्रत्येकी 20 लाख व अन्य मिरवणुकांतही असाच मोठा खर्च झाला. एकूणच खर्चाची झालेली आकडेवारी 8 कोटी 64 लाखांच्या घरात पोहोचली आहे.

सहा लाखांचा खर्च
सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळात सवाद्य वाजंत्रीसह जवळपास 16 च्या आसपास मिरवणुका होत्या. कार्यकर्त्यांचे मिरवणुकीतील कपडे, गाडीचे डिझेल आणि इतर गोष्टींसाठी जवळपास सर्वांचा मिळून सहा लाखांच्या आसपास खर्च झाला असावा.’’ संजय शिंदे, अध्यक्ष, मध्यवर्ती उत्सव समिती