आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम्राट चौक ते रूपाभवानी रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सम्राट चौक ते रूपाभवानी चौक या दरम्यान असलेल्या एमएसआरडीच्या रस्त्यावरील फुटपाथ एकतर घाणीच्या साम्राज्यात अन् अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्याच्या दुतर्फा घाणीचे साम्राज्यच पसरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिका त्याकडे दुर्लक्ष करते आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही, पाण्याचा निचरा होण्याची सोय नाही.

महापालिकेने शहरातील रस्ते रूंद करून जवळपास 10 वर्षे होत आली. सम्राट चौक ते रूपाभवानी ते दयानंद महाविद्यालय हा रस्ताही त्याचवेळी तयार झाला. सुरुवातीला एमएसआरडीसीकडे या रस्त्याची देखभाल होती, नंतर महापालिकेकडे ती आली आहे. गेल्या दहा वर्षापासून या रस्त्यावरील चित्र जैसे थेच दिसते आहे. महापालिका परिवहन बसडेपो समोरील रस्त्यावरच नेहमीच पाणी साचलेले असते. पुढच्या चौकात तर रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असे चित्र आहे. वाहतूकही विस्कळित होते. तेथून पुढे वर्धमान नगर, मंत्री चंडक, वर्धमान हाईट अशा अनेक सोसायट्या आहेत. त्या परिसरातही रस्त्याच्या कडेला फुटपाथवर कचर्‍याचेच साम्राज्य दिसते आहे. रूपाभवानी चौकात आयलँड करण्यात आला आहे, त्याचीही दुर्दशा झाली आहे. मंत्री-चंडक नगर समोर तर रस्त्यावर खड्डा पडला आहे, त्यामुळे अपघात होताहेत. हनुमान नगर, शाहीर वस्ती, बुधवार पेठ या नागरी वसाहती या रस्त्याच्या कडेला आहेत.

स्वच्छता ठेवू
सम्राट चौक ते रूपाभवानी रस्त्यावरील माझ्या हद्दीतील प्रभागात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांना या रस्त्यावरून पायी चालत जावे लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता व फुटपाथ स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’ आनंद चंदनशिवे, नगरसेवक

पालिकेचे दुर्लक्ष
महापालिकेकडे या संदर्भात अनेकवेळा तक्रारी केल्या पण त्याचा काहीच परिणाम होत नसल्याच्या प्रतिक्रिया तेथील रहिवाशांमधून होत आहेत. वर्धमान नगर जवळ कचराकुंडी ठेवली आहे. समोरच शाहीर वस्ती, मंत्री चंडक अशा नागरी वसाहती आहेत. त्यांना रस्ता ओलांडून कचरा टाकण्यासाठी यावे लागते.