आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसच्या भडक्याने महिलेचा मृत्यु; लिकेजमुळे घरात आग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दोन डिसेंबर रोजी गॅसचा भडका उडून भाजलेल्या अलका मिलिंद मोरवडे (वय 35, अकलूज) या महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद आहे. सात रस्ता परिसरातील विद्याविहार अपार्टमेंटमधील प्रकार; जीवितहानी नाही.
तसेच दुसर्‍या घटनेत सात रस्ता पसिरातील विद्याविहार अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या प्राध्यापिका रश्मी राजू कुलकर्णी यांच्या घरात गॅस लिकेजमुळे आग लागली. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमाराला घडली. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. मात्र, घरातील महागडे साहित्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. पाच लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी घराचे नूतनीकरण केले होते.
रश्मी या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात (डब्ल्यूआयटी) प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती राजू कुलकर्णी हे पाटबंधारे खात्यात फोंडा (रत्नागिरी) येथे अभियंता आहेत. त्यांची मुलगी राधा पाचवीत शिकतेय. सकाळीच ती शाळेत गेली. रश्मी घरात स्वयंपाक करत होत्या. गॅसवर कुकरमध्ये डाळ-भात लावला होता. अचानक गॅसचा वास आल्यामुळे त्या स्वयंपाक घरात गेल्या. गॅस बंद करत असतानाच एकदम आग लागली. सावधगिरी बाळगून त्या घरातून बाहेर आल्या. शेजारील व त्यांच्या घरावरील नागरिकांना तातडीने बाहेर काढून सर्वजण मोकळ्या मैदानात आले. अपार्टमेंटमधील अन्य सहकार्‍यांनी अग्निशामक दलाला व सदर बझार पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर काही वेळातच एक बंब आला. पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणली.
घरातील साहित्य जळून खाक
सोफा सेट, फ्रिज, गिझर, एसी, टीव्ही, डीव्हीडी, तीन पेट्या सिल्क साड्या, भांडी, घरातील वीज वायर, पडदे, नळ आदी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. घराच्या भिंती काळ्या झाल्या आहेत. घरात दोन सिलिंडर टाक्या होत्या. त्या अग्निशामक जवानांनी बाहेर आणल्या. सुधीर खरटमल यांनी सहकार्‍यांसोबत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
जीवित हानी नाही
आग लागल्यानंतर सौ. कुलकर्णी यांनी शेजार्‍यांना खाली आणले. त्यांची मुलगी शाळेत गेली होती. सावधगिरी बाळगल्यामुळे मोठी जीवितहानी टाळली.
सुरक्षा ट्यूब बसवून घ्या
सिलिंडर व शेगडी यांना लावण्यात येणारी ट्यूब (पाइप) चांगल्या दर्जाची हवी. आता नव्याने पाच वर्षे वॉरंटीची सुरक्षा ट्यूब आली आहे, ती बसवून घ्यावी. रेग्यूलेटर व्यवस्थित बसले आहे का पाहा. बॉलबेअरिंग चांगले बसवा. सिलिंडर डिलिव्हरी करणार्‍या तरुणाकडून रेग्यूलेटरला लावण्यात येणारी पाइप कशी बसवावी, हे समजून घ्या. गॅस लिक झाल्यामुळे आठवडाभरात तीन दुर्घटना घडल्या आहेत. घोंगडे वस्तीत एका हॉटेलात लिकेजमुळे आग लागली होती. धोत्रीकरवस्ती परिसरात घरात गॅस लिकेजमुळे एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. नागरिकांनी गॅसचा वापर करताना सावधानता बाळगावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी.
- केदार आवटे, अधीक्षक, अग्निशामक दल