आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांत 15 लाख आधारकार्डचे आव्हान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- घरगुतीवापराच्या गॅसवरील अनुदान बँक खात्यात जमा करण्याची अंमलबजावणी काही जिल्ह्यांत 15 नोव्हेंबरपासून तर देशात जानेवारीपासून होणार आहे. त्यासाठी आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे. आधारकार्ड नोंदणीची मोहीम थंडावली आहे. जिल्ह्यात अद्याप 34 टक्के लोकांकडे आधारकार्ड नाही. येत्या दोन महिन्यांत हे लक्ष्य पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सरकारने ही योजना सुरू केली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी ती थांबवली. भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा ही योजना आणली आहे. इतकेच नव्हे तर केवळ दोन महिन्यांत अंमलबजावणी सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ४० लाखांपैकी १४ लाख 64 हजार 470 जणांकडे आधारकार्ड नाही.
एकीकडे जानेवारीच्या आत सुमारे15 लाख लोकांना आधार क्रमांक उपलब्ध करून देणे हे आव्हान प्रशासनापुढे आहे. तर दुसरीकडे मक्तेदार खासगी कंपन्यांनी काम थांबवले आहे. त्यामुळे आव्हान आणखीनच कठीण झाले आहे. सध्या जिल्ह्यातील 54 महा सेवा केंद्रावर याची नोंदणी सुरू आहे, पण त्याची गतीही मंद आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना विशेष आधार क्रमांक देण्याचे काम सुरू आहे. कामे व्यवस्थित केलेल्या मक्तेदार कंपन्यांना लाखो रुपयांचा दंडही झालेला आहे. त्यामुळे त्यांनी आधारकार्ड काढण्याचे काम थांबवले आहे. तत्पूर्वी सुमारे 500 यंत्रणांच्या साहाय्याने हे काम सुरू होते. इतकी मोठी यंत्रणा सुमारे दोन वर्षे काम करूनही केवळ ६६ टक्के काम पूर्ण होऊ शकले आहे. आताच्या यंत्रणेमार्फत हे काम पूर्ण होणे अिधक कठीण िदसत आहे.

सर्वाधिक नोंदणी शहरात ७७.८८ टक्के झाली आहे. सर्वात कमी ४९.७४ टक्के नोंदणी माळशिरस तालुक्यात झाली आहे. ग्रामीणमध्ये बार्शी, माढा, उत्तर सोलापूर तालुक्यात ७० टक्केपेक्षा अधिक लोकांकडे आधार आहे. पंढरपूर, सांगोला मंगळवेढा तालुक्यात ६० टक्केपेक्षा अधिक तर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ या तालुक्यातील ५५ टक्के नागरिकांकडे आधार कार्ड आहेत. ही स्थिती पाहाता मुदतीत काम पूर्ण होणे अशक्य कोटीतील वाटत आहे.