आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gautam Gawali Speak In 'Milind Lecture Series' At Solapur, Divya Marathi

‘बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळेच देश राहिला एकसंध’- प्रा. डॉ. गौतम गवळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळेच आजही लोकशाही सक्षम असून देश एकसंध राहिला आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गौतम गवळी (मुंबई) यांनी केले.सम्यक विचार मंचतर्फे महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या मिलिंद व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘भारतातील सामाजिक स्थिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजिलेल्या मिलिंद व्याख्यानमालेचे शुक्रवारी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बुर्ला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रा. डॉ. गवळी म्हणाले, ‘‘आपल्या देशामध्ये 190 विविध धर्म असून दीड हजारांपेक्षा जास्त जाती-पोटजाती आहेत. समाजातील लहान घटकांचे अद्यापही व्यवस्थापन झाले नाही. पण, सामाजिक सुधारक, अभ्यासकांनी त्यांच्या लेखन, साहित्यातून त्याबाबत समाजव्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला असून सध्याही त्याबाबतचे प्रयत्न सुरूच आहेत. पाश्चात्य राष्ट्रांनी बुद्धिमापन चाचणीद्वारे सामाजिक भेदांबरोबर स्त्री व पुरुषांच्या बौद्धिक क्षमतांबाबत भेदभाव निर्माण केलेत. त्यामुळे निर्माण झालेला कलह सोडविण्यात अनेकांना जीव गमवावे लागले. त्याचेच अनुकरण हिटरलने करून छळवाद केला. पाश्चात्यांनी चाचणीद्वारे आलेल्या अनुमानातून निर्णय घेतले. पण, आपल्या देशात कोणतेही अनुमान न करताच काही समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारण्याचे अघोरी कृत्य झाले. सामाजिक अन्याय, अत्याचारास वाचा फोडण्याबरोबर दुर्बलांना आधार देऊन प्रगतीकडे वाटचाल करण्यास डॉ. आंबेडकरांनी प्राधान्य दिले. त्यांनी देशाला अर्पण केलेल्या राज्यघटनेमुळे देश एकसंध राहिला.’’

याप्रसंगी कुलगुरू डॉ. मालदार, डॉ. शेंडगे यांची भाषणे झाली. सम्यक विचार मंचचे राजशेखर जेऊरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अंजना गायकवाड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.