आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ, दरहजारी 917

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘मुलगी म्हणजे परक्याचे धन, मुलगाच वंशाचा दिवा’ या विचारांना सोलापूर जिल्ह्यातून जोरदार फाटा मिळत असल्याचे आशादायी चित्र दिसत आहे. जिल्ह्यात 2008 पासून मुलींच्या जन्मदरात फारशी वाढ होत नव्हती, मात्र 2012 आणि 13 या वर्षात मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ झाली आहे. 2011 मध्ये दरहजारी मुलींचे प्रमाण 850 होते, 2012 मध्ये ते 917 इतके झाले. 2013 च्या एप्रिलपर्यंत 15075 मुलांमागे 13552 मुलींचा जन्म झाला आहे.

2008 पासून 2011 पर्यंत मुलींच्या जन्मदरात 822 ते 850 अशी जेमतेम वाढ झाली होती. बेटी बचाओ, लेक वाचवा या अभियानांच्या माध्यमातून शासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे हा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.

जिल्ह्याच्या दृष्टीने सकरात्मक बाब : गेल्यावर्षी शहरात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे राज्यभरात सोलापूरचे नाव वाईट अर्थाने चर्चेला आले होते. आता मुलींच्या जन्मदरात वाढ झाली असून, हे प्रमाण 917 झाल्याने तब्बल एक वर्षाच्या अंतराने सोलापूरचे नाव याबाबतीस सकारात्मक दृष्टीने चर्चेत येणार आहे. सोलापूर शहर व काही तालुक्यांच्या ठिकाणी सोनोग्राफी सेंटरवरील बंदी व कडक निर्बंधांचाही स्त्रीभ्रूणहत्येला आळा बसण्यासाठी उपयोग झाला आहे.

जन्म दर 950 च्या पुढे जायला हवा
मुलींच्या जन्मदराचा 917 हा आकडा फार समाधानकारक नाही. तेवढय़ावरच न थांबता हा आकडा 950 च्या पुढे जायला हवा, तरच आम्ही काही केल्याचे समाधान आम्हाला मिळेल. त्यासाठी शासनाने जनजागृती करणे, दारोदारी प्रचार करणे आवश्यक आहे. अँड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या

अभियानाचे यश
मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याने शासनाचे अभियान आणि नागरिकांच्या मानसिकतेत झालेला बदल या दोन्ही बाबी स्वागतार्ह आहेत. शीतलकुमार जाधव, साहाय्यक आरोग्याधिकारी