सोलापूर - खेड्यातीलसंस्कृती, कारागिरांची कला हे
आपले वैभव आहे. अनेक कारागिरांनी अडचणींवर मात करत पारंपरिक कला जोपासली असून त्यातून मिळणा-या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. त्या पारंपरिकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादित माल थेट ग्लोबल मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेची ग्रामीण विकास यंत्रणा पुढाकार घेईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली.
‘दिव्य मराठी’च्या ‘मेक इन सोलापूर’ मोहिमेसाठी त्यांनी ग्रामीण भागातील पारंपरिक, कृषिपूरक उद्योगांची मांडणी केली.
ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने प्रामुख्याने शेतकरी कारागिरांची मुलं नोकरीसाठी शहरात स्थलांतरित होतात. त्याऐवजी त्यांच्यातील कलागुणांना आधुनिक तंत्रज्ञाद्वारे प्रशिक्षण दिले तर निश्चित त्यांच्या करिअरला वेगळी कलाटणी मिळेल. ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांची मोठी चळवळ ग्रामीण भागात उभी राहिली आहे. त्यागटाच्या माध्यमातून उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. लोणचे, पापड तयार करण्याबरोबर त्या गटांना लघु उद्योग उभारण्यासाठीही आम्ही प्रोत्साहित करणे, समुपदेशनासाठी पुढाकार घेतोय. महिला बालकल्याण, कृषी समाज कल्याण विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या योजनांद्वारे लघु उद्योगपूरक औजारांचे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येते.
प्रशिक्षणाची तयारी
मातीकाम,सुतार, लोहार, शिवणकाम यासह पारंपरिक व्यवसाय करणा-यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेईल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पमुदतीचे प्रशिक्षण देण्याबाबत आमची चर्चा झाली आहे. त्या उत्पादित मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत होणारे महालक्ष्मी रसस किंवा जिल्हास्तरीय प्रदर्शन भरवण्यात येतील. जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवरून जगाच्या कानाकोप-यात त्या वस्तूंच्या विक्रीची माहिती पोचवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.