आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मच गया शोर सारी नगरी रे...’; गोकुळाष्टमी गोविंदांनी केला आनंदोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दुपारच्या उन्हात ते सायंकाळपर्यंत गोविंदांनी लाडक्या बाळकृष्णाचा जयघोष करत, पाण्याच्या धारा अंगावर झेलत, गुलालाच्या उधळणीत सप्तरंगात न्हाऊन दहीहंडी फोडल्या. डॉल्बीच्या दणदणाटाने गोविंदाच्या उत्साहाला पारावार उरला नाही. तमा न बाळगता गोविंदा मानवी मनोरे रचत उंचावर बांधलेल्या दहीहंड्या एकापाठोपाठ फोडत होते.

प्रमुख ठिकाणच्या दहीहंडी फोडण्याचा मान बुधवार पेठ, लष्कर, रविवार पेठ येथील वडार समाजाला आहे. शतकोत्तर वर्षांची परंपरा राखत विविध घटकांंनी उभारलेल्या दहीहंडी फोडून सामाजिक संदेश दिला.

बुधवार पेठ येथील वडार समाजाच्या वतीने सोमवारी शहरातील विविध दहीहंड्या फोडण्यात आल्या. सोमवारी चार वाजता दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा मार्गस्थ झाले. मार्गावर सुमारे 20 ते 22 दहीहंडी त्यांनी फोडल्या. उत्सवप्रेमी व्यक्तींनी उभारलेल्या आणि सर्व समाजघटकांच्या दहीहंड्यांचा यात समावेश होता. गोविंदा पथकात सुमारे 75 गोविंदांचा समावेश होता. वडार गल्ली, बाळीवेस, चाटी गल्ली, मधला मारुती, माणिक चौक, जुनी फौजदार चावडी, जुने विठ्ठल मंदिर, चौपाड आदी मार्गांवर दहीहंडी फोडण्यात आली. या वेळी महादेव अलकुंटे, रामदास धोत्रे, सूर्यकांत धोत्रे, अरविंद धांडेकर आदी वडार समाजाचे मान्यवर उपस्थित होते.

बाळीवेस येथे गोविंदा मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असता त्यावेळी लोकांकडून केळी व साली फेकण्यात आल्या. केळीच्या सालावरून पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असते. बाळीवेस, माणिक चौक, आजोबा गणपती, बुरूड गल्ली, तुळजापूर वेस, राजेंद्र चौक, कन्ना चौक, टिळक चौक, विजापूर वेस, शुक्रवार पेठ, भांडी गल्ली, मधला मारुती आदी भागांत उंच दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या.
क्रेनची दहीहंडी ठरली लक्षवेधी
बाळीवेससह अनेक ठिकाणी क्रे नच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. असा पहिलाच प्रकार आहे. सुरुवातीला ती 50 फूट उंचीवर होती. मात्र, इतक्या उंचीवर पोचून दहीहंडी फोडणे गोविंदांना शक्य नव्हते, त्यामुळे दहीहंडीची उंची कमी करण्यात आली. त्यानंतर गोविंदांनी दहीहंडी फोडली.