आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा धुमाकूळ: आयुक्तालयाजवळच तरुणीची सोनसाखळी पळवली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाविद्यालयीन विद्यार्थिनी खासगी क्लासमधून पायी घरी जाताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी तिच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. गांधीनगरातील पोलिस आयुक्तालयाजवळ ही घटना घडली. चाळीस दिवसांत शहरात वीस मंगळसूत्र व सोनसाखळी पळवल्याच्या घटना घडल्या. घरफोडी, चोरी, जबरी चोरींचा तर कहरच आहे. सदर बझार पोलिस ठाण्यापासून शंभर तर पोलिस आयुक्तालयापासून दीडशे मीटरवर चेन स्नॅचिंगची घटना झाल्याने पोलिसांचा चोरांवर काहीच धाक नसल्याचे दिसून येत आहे.

वैष्णवी महाजनी (रा. साधू वास्वानी उद्यान, गुरुनानक चौक) या विद्यार्थिनीने सदर बझार पोलिसात फिर्याद दिली. गुरुवारी रात्री साठेआठच्या सुमाराला ती लष्कर येथील खासगी क्लास आटोपून घरी जात होती. गांधीनगरातील हेरिटेज अपार्टमेंटजवळ आल्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी एकाने गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. त्याची किंमत तीस हजार रुपये आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र थोरात तपास करत आहेत.

भर दुपारी ट्रकचालकास लुटले
जुना कारंबा नाक्यावरील उपाध्ये कारखान्याजवळ ट्रकचालकाला मारहाण करून चाकूचा धाक दाखवून दोन मोबाइल आणि तीन हजार रुपये असा ऐवज तिघांनी पळवला. मनोहरन रामस्वामी (वय 28, रा. अरुणदरीयर कॉलनी, नानकल, तामिळनाडू) यांनी जोडभावी पोलिसात फिर्याद दिली. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमाराला रामस्वामी ट्रकमधून (टीएन 28 पी 9211) तुळजापूर रोडच्या दिशेने जात होते. तिघे तरुण मोटारसायकलवरून आले. गाडी आडवून चालकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी करत मोबाइल, पैसे पळविले. फौजदार बोधे तपास करीत आहेत.

जुळे सोलापुरात मंगळसूत्र पळवले
जुळे सोलापुरातील डी. फार्मसी कॉलेजजवळून पायी जाताना तक्षशीला निशांत साबळे (रा. जानकीनगर) यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरांनी हिसकावून नेले. ही घटना सहा फेब्रुवारी रोजी घडली. विजापूर नाका पोलिसात त्यांनी फिर्याद दिली. रात्री आठच्या सुमाराला त्या सासूसोबत पायी घरी जात होत्या. पोलिस निरीक्षक विकास रामगुडे तपास करत आहेत.

अंत्रोळीकरनगरात घरफोडी
अंत्रोळीकरनगर भाग दोन येथील रईस अहमद शेख यांच्या घरातून दोन लाख साठ हजार रुपये चोरांनी दिवसा पळवून नेले. शेख यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली. ही घटना सहा फेब्रुवारी रोजी घडली. शेख परिवार हे सकाळी सातच्या सुमाराला बाहेर गेले होते. चोरांनी घराचा कडीकोयंडा उचकटून कपाटातील पैसे पळवून नेले. सकाळी अकराच्या सुमाराला घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.