आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर'- राजकारण स्वत:भोवती फिरत ठेवले नाही. सर्वसामान्य माणसांना कधीच निराश केले नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा नेता होता. त्यांच्या जाण्याने भाजपबरोबर बीडसह महाराष्ट्राचे नुकसान झाले, असे मत सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त झाले. शहर भाजपच्या वतीने बुधवारी डॉ. फडकुले सभागृहात मुंडे यांना र्शद्धांजली वाहण्यात आली. या वेळी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, राष्ट्रवादी अध्यक्ष महेश गादेकर, भाजप अध्यक्ष विजयकुमार देशमुख, रिपाइंचे राजाभाऊ सरवदे, शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण, उपमहापौर हारून सय्यद, स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्रींसह सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दोनवेळा आमदार केले. त्यांनी भाजप ग्रामीण भागात नेला,’ असे शहराध्यक्ष, आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले. ‘विधानसभेत ‘नाही रे’ वर्गासाठी लढणारा नेता होता. विलासराव आणि गोपीनाथराव यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान झाले,’ असे काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी सांगितले. ‘महाराष्ट्रात कार्यकर्ता घडवणार्‍या नेत्यापैकी मुंडे एक होते. आपल्या घरातील कोणी तरी गेले असे वाटले,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी भावना नोंदवली. धाडसी आणि निगर्वी नेता होता,’ अशी भावना रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी व्यक्त केली.

शोकसभेत कारखानदार पेंटप्पा गड्डम, प्रभाकर वनकुद्रे, हाजीमंलग नदाफ, डॉ. रफिक सय्यद, विश्वनाथ बेंद्रे, बाबा मिस्त्री, प्रकाश आळंदकर, नागेश वल्याळ, रामचंद्र जन्नू, आरिफ शेख, रियाज अत्तार, राजू होटगीकर, संजय क्षीरसागर, प्रताप चव्हाण, सुबोध वाघमोडे, सिद्धप्पा कलशेट्टी आदींनी भावना व्यक्त केल्या. आमदार प्रणिती शिंदे यांनी मुंडे यांच्याबाबत लिखित शोकसंदेश पाठवला होता, तो प्रा. अशोक निंबर्गी यांनी वाचला.