आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉटस् अप - निवडणुका घोषित, नेटिझन्सकडून चर्चेचे गुऱ्हाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातील निवडणूक घोषणा झाली, आचारसंहिता लागू झाली, याबाबतचे वृत्त सोशल मीडियात आल्यानंतर चर्चा नव्हे तर महाचर्चेला प्रारंभ झाला. प्रतिक्रियेचे गुऱ्हाळ सुरू झाले. आघाडीच्या तोंडाला आता कुलूप लागेल, नसते योजना फेकत होते, वाचलो.. आता सगळ्या सरकारी जाहिराती (महाराष्ट्र पुढे वाल्या...) बंद होतील आणि आमचे पैसे वाचतील, अशा अनेकविध प्रतिक्रिया नेटिझन्सने व्यक्त केल्या.
लागली एकदाची आचारसंहिता.. आता सरकारची नसलेली कार्यक्षमता दोन महिने गोठून जाईल. प्रचाराला फक्त १२ दिवस ? चुकीचे वेळापत्रक वाटते. सरकार स्थापन करण्याची मुदत नोव्हेंबर असताना १९ तारखेला निकाल लागल्यानंतर तारखेपर्यंत म्हणजे तब्बल २० दिवस कशासाठी ? दिवाळी पाहून वेळापत्रक केलेले दिसते असेही काहीनी म्हटले.
एकाने मात्र म्हटले, जास्तीत जास्त लोकांनी ‘नोटा' (पक्षी : नकाराधिकार, गैरसमज नसावा) चा वापर करावा निष्कामी उमेदवारांना त्यांची जागा दाखवून द्यावी. कारण बऱ्याच मतदार संघात यंदा पक्ष बदलून आलेले उमेदवार दिसतील. तुम्हाला वाटते हे जनसेवेसाठी आमदार बनणार आहेत. तसे काहीच नाही. सत्तेची आस असल्याने तेच उमेदवार नव्या रूपात असतील. राजकीय घराणेशाही पाळणारे उमेदवार आपल्या आजोबा पणजोबाच्या कार्यावर मते मागतील. गुंडगिरी, नोकऱ्यांचे आमिष, पैसे वाटणारे उमेदवार यांना जनसेवा करायची आहे काय याचा मतदारांनी विचार करावा. वर्षानुवर्षे पाणी, वीज, रस्ते याच प्रश्नावर राजकारण करणारी मंडळी. यांच्यासाठी नोटा याच पर्यायाचा वापर योग्य आहे, अशा सूचनाच जागरूक मतदार या नावाने दिल्या गेल्या. एकूणच निवडणूक आचारसंहिता यांच्या चर्चेला आता कुठे सुरवात झाली आहे. यापुढे त्यात अनेकानेक रंग भरत जातील, हीच खरी निवडणुकीची रणधुमाळी असेल.