सोलापूर - वीज बिलांची थकबाकी किंवा दुरुस्तीच्या कारणात्सव बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी शासनाकडून ग्रामपंचायतींना येणारे थेट अनुदान पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी वळविण्यात येईल. पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकशाही दिनाच्या निमित्ताने आयोजिलेल्या पत्रकार परिषेदत जिल्हाधिकारी मुंढे बोलत होते. बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबत दरवर्षी उन्हाळ्यात ओरड होते. एरवी त्या योजनांकडे दुर्लक्ष होते. थकीत वीज बिलापोटी त्या योजना बंद पडतात. त्या पुन्हा सुरू करण्यासाठी लोकवर्गणीद्वारे ५० टक्के रक्कम जमा करणे ५० टक्के जिल्हा परिषदेतर्फे पैसे भरून त्या योजना सुरू करता येतात. त्याप्रमाणे जेऊर (ता. करमाळा) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा कार्यान्वित झाली. त्याचप्रमाणे इतर गावांमधील नळ पाणी पुरवठा योजना वीज बिलाची थकबाकी किंवा दुरुस्तीच्या कारणात्सव बंद असल्यास त्याही सुरू करण्यात येतील. त्यासाठी शासनाकडून ग्रामपंचायतींसाठी येणारे अनुदान जिल्हाधिकार्यांच्या मार्फत वितरीत होते. ते अनुदान ग्रामपंचायतींच्या नळ पाणी पुरवठा योजनांसाठी खर्चास मंजुरी देण्याचे धोरण आम्ही घेतले आहे. जिल्हा परिषदेस त्याबाबतचे आदेश दिले आहेत, असेही जिल्हाधिकारी मुंढे यांनी सांगितले.
पाणीटंचाई मिटवण्यासाठी टँकर हा तात्पुरता पर्याय आहे. दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणे, हे जिल्ह्याच्या विकासासाठी कौतुकास्पद नाही. त्याऐवजी आम्ही कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. टँकर सुरू करण्यासाठी शासनाचे आठ प्रमुख निकष आहेत, त्याबाबतच्या उपाययोजना करूनही पाणी समस्या असल्यास टँकर सुरू करता येतील. टँकर मंजुरीसाठी त्रिस्तरीय समिती असून ती सर्व निकषांची पाहणी करून निर्णय घेतले. जिल्हा प्रशासन टँकर देत नसल्याबाबतच्या चुकीच्या अफवा पसरवण्याचे प्रकार सुरू आहेत. पण, वास्तविक नागरिकांची पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये किमान दहा एकर क्षेत्र आजही बागायतीखाली आहे.
पाणीपुरवठ्यासाठी विहीर, कूपनलिका अधिग्रहण करून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन तयार आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करीत पाण्याऐवजी टँकरच सुरू करण्याचा अट्टहास योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाझर तलावांमधील गाळ काढण्याची मोहीम ३१ मे पर्यंत सुरू राहणार असून त्यास चांगला प्रतिसाद आहे. त्या कामांमध्ये अडथळे आणणार्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. गाळ काढल्यामुळे पावसाळ्यात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चांगली कामे सुरू आहेत. जलपुर्नभरणाच्या कामांवर आमचे लक्ष आहे.
जिल्हाधिकारी म्हणतात...
- जिल्ह्यात सुमारे १७० छोट्या-मोठ्या योजना कार्यान्वित आहेत.
- ठिबक सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी उद्योजकांबरोबर पुढील आठवड्यात बैठक घेणार
- ऑनलाइन सातबारा उतारे देण्याची प्रक्रिया सांगोला, मोहोळ मंगळवेढा तालुक्यात सुरू
- लोकसहभागातून जलपुनर्भरणाच्या कामांना प्राधान्य देणार
- गेल्यावर्षी परतीचा मान्सून झाल्याने उजनीतून उन्हाळी पाणीपाळी लवकर द्यावी लागली
- लोकशाही दिनात दाखल झालेल्या दोन प्रकरणांपैकी एक निकाली काढले.
- मागील चार प्रकरणांपैकी एक निकाली काढले असून तीन शासनाकडे प्रस्तावित केलेत
- मंगळवारच्या लोकशाही दिनात एकूण ३५ निवेदने दाखल झाली