आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Is Committed For Change The Economic Situation Of Farmers

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जमिनीची पोत तपासणी, पावसाचा प्रत्येक थेंब स्वत:च्या हद्दीत अडवणे, पीक घेण्याचे नियोजन उपलब्ध पाणी अन्् जमिनीचा क्षमता या पंचसूत्रीच्या आधारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती उद्योग करावी. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून आपण सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.
(कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन कृषी जागृती सप्ताहाचा प्रारंभ श्री. मुंढे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. बनसोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवास पत्की, कृषी अधीक्षक रफिक नाईकवाडी, जि. प. कृषी विकास अधिकारी मदन मुकणे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. पॉल, हवामान शास्त्रज्ञ डॉ. जयवंतराव जाधव आदी उपस्थित होते.
श्री. मुंढे म्हणाले की, (कै.) वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे त्याचा विसर पडता कामा नये. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती उद्योग शेती व्यवस्थापन याची सांगड घालत शेती करावी. अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करावी.
त्याचबरोबर आपल्या जमिनीचा पोत पाहून शेतकऱ्यांनी विविध उत्पादने घ्यावीत. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंबन् थेंब अडवावा. एक हेक्टरमध्ये पावसाचे किमान ५० लाख लिटर पाणी जमा होते. त्या पाण्याचे योग्य नियोजन करून शेती करण्याची गरज आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. प्रत्येक पिकाच्या लागवडीपूर्वी माती परीक्षण केलेच पाहिजे. त्या परीक्षणामुळे आपल्या रानातील मातीमध्ये कोणते घटक आहेत, कोणते कमी आहेत, त्यामध्ये कोणती पिके चांगल्या पद्धतीने येतील याबाबतची संपूर्ण माहिती मिळते. यापुढे माती परीक्षणाची मोहीम जिल्ह्यात गतिमान करण्यासाठी स्वतंत्र अभियान राबवण्यात येईल, असेही श्री. मुंढे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, देशाला दुसऱ्या हरितक्रांतीची आवश्यकता आहे. सुरुवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी यांनी जिल्ह्यात २२ टक्के इतक्या क्षेत्रावर खरीप पेरणी झाल्याचे सांगितले. तसेच येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार इतके जमिनीच्या मातीचे नमुने घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
यशस्विनी महिला (बोरामणी), खंडोबा (वडजी, ता. दक्षिण सोलापूर) शेतकरी राजा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी उत्तर सोलापूर यांना शेतकरी उत्पादक कंपनीचे आयएसओ (ISO) नोंदणी प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. "आत्मा'चे प्रकल्प संचालक डी. एस. गवसाने यांनी आभार मानले.
लोकप्रतिनिधींची पाठ
कृषीसप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमास एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन आयोजिले होते. पण, ते उपस्थित नव्हते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, कृषी समितीचे सभापती पंडित वाघ यांच्यासह सर्व पदाधिकारी गैरहजर होते. फक्त दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती गुरुनाथ म्हेत्रे कार्यक्रमास उपस्थित होते.