आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समान नागरी कायदा, ३७० कलम यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा - मोहन भागवत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - काश्मीर संदर्भातील ३७० कलम, समान नागरी कायदा आणि राम मंदिराची उभारणी हे विषय संघाच्या अजेंड्यावर आहेतच, आता पुढची जबाबदारी सरकारची आहे. सरकार जर त्यासाठी पुढाकार घेत असेल तर आमचा पाठिंबा आहेच, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडली.

डॉ. भागवत हे शुक्रवारी सोलापुरात आले होते. त्यांनी शहरात दोन बैठका घेतल्या. सकाळी शिवस्मारक सभागृहात निवडक संघ कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. तर सायंकाळी गुजराथी भवनमध्ये संघप्रेमी उद्योजक, व्यवसायिक, विचारवंत लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. ""रिटेल क्षेत्रात विदेशी गुंतवणूक नकोच. जेथे आवश्यक तेथेच ती देशहिताचा विचार करूनच आणावी. स्वावलंबनात देशाची सुरक्षितता आहे, त्यामुळे विदेशातून गुंतवणूक आणताना देशहिताशी तडजोड नकोच.

सारे जग भारतीयांना हिंदू मानते, भारत हे नाव घेतले की, पाठोपाठ हिंदू येतोच. भारतीयत्व म्हणजे हिंदुत्व, त्यामध्ये भेदाभेद मुळीच नाही, आणि समाज परिवर्तनासाठीच हिंदू संघटन आहे. हा संघाचा मूळ विचार आहे. समाज निर्दोष संघटित होत नाही, तोपर्यंत परिवर्तन होत नाही. समाजातील दुर्गुणांमुळे भारत पारतंत्र्यात का गेला, हे डॉ. हेडगेवार यांनी ओळखले. समाजातील दोष दूर करण्यासाठी काम केले. शाखा हे त्याचे माध्यम आहे. गेली ९० वर्षे संघ हेच करतो आहे. संघ समजण्यासाठी अनुभव घ्यावा लागतो. अनुभव येत नाही, तोपर्यंत संघ समजणार नाही.

भूसंपादन कायद्यातून उद्योजकांचे भले नको : भागवतांचा सल्ला
भूसंपादनकरताना शेतकऱ्यांचा रोजगार जाऊ नये. भूसंपादन हे शेतकऱ्यांच्या, सरकारच्या हितासाठी असावे, उद्योजकांच्या भल्यासाठी नको. नापिक, कोरडवाहू, जमिनीवर उद्योगधंद्यांना प्राधान्य द्यावे, असा सल्ला श्री. भागवतांनी सरकारला दिला. गोहत्या बंदी हा भावनिक मुद्दा नाही. त्यामागे शास्त्रीय आधार आहे. गाय हे धन आहे, देशी गायींचे जतन व्हायला हवे, असेही ते म्हणाले. संघाचा सरकारवर रिमोट कंट्रोल वगैरे काही नसतो. त्याची आवश्यकताही नाही. देशासाठी संविधान महत्त्वाचे. संिवधानाप्रमाणे सरकार चालले पाहिजे, हेच संघाला अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...