आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदामात मुबलक धान्य तरीही नागरिक वंचित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भारतीय धान्य महामंडळाच्या (एफसीआय) गोदामात मुबलक धान्य असून त्याची वाहतूक सुरळीत होत नसल्याने शिधापत्रिकाधारकांना ऐन दुष्काळात धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांकडून सुरळीत वाहतूक होत नसल्याने दिवाळी, दसरा, ईद सारख्या सणात शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित होते.

फेब्रुवारीत केशरी शिधापत्रिकाधारकांचा 1067 टन गहू आणि 183 टन तांदूळ याची वाहतूक झाली नाही. दारिद्रय़ रेषेखालील शिधापत्रिकाधारकांसाठीचा अतिरिक्त 258 टन गहू आणि 185 टन तांदूळ उचलला नसल्याने लाभार्थ्यांना मिळाला नाही. अंत्योदय योजनेचा 44 टन गहू आणि 108 तांदूळ उचल नाही. दारिद्रय़ रेषेखालील शिधापत्रिकाधारकांचा 26 टन तांदूळ वाहतूक न झाल्याने रास्त भाव दुकानपर्यंत पोचलेला नाही. मार्चमध्ये दारिद्रय़ रेषेखालील 364 टन गहू आणि 428 टन तांदूळ उचल नाही. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांचा 144 टन गहू व 108 तांदूळ उचल नाही. केशरी शिधापत्रिकाधारकांसाठीचा 173 टन गहू व 517 टन तांदूळ उचल नाही. वाहतूक ठेकेदाराने एफसीआय गोदामातून धान्य शासकीय गोदामात आणल्यानंतर ते रेशन दुकानदारांना वाटप केले जाते. दारिद्रय़ रेषेखालील आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांनाही धान्य मिळत नसल्याने त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठेकेदाराला दीड कोटीचा दंड
एप्रिल 2012 मध्ये वाहतूक ठेकेदार एस. बी. कोनापुरे यांना तत्कालीन जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी एक कोटी 52 लाख, 52 हजार 570 रुपयांचा दंड केला होता. ठेकेदाराने वाहतूक न केल्यामुळे एकूण धान्याच्या रकमेपैकी दहा टक्के रकमेचा दंड केला आहे. म्हणजे ठेकेदाराने सुमारे पंधरा कोटी रुपयांच्या धान्याची वाहतूक न केल्याने ते धान्य सरकार जमा झाले होते. हा दंड अद्याप वसूल नसून ठेकेदाराने याविरोधात अपील केले आहे.