आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीत रंगला होम प्रदीपन सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील होम प्रदीपनचा सोहळा गुरुवारी रात्री उत्साही वातावरणात पार पडला. बोचऱ्या थंडीत हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी होम मैदानावर गर्दी केली होती. यंदा सर्व धार्मिक विधी वेळेवर पूर्ण झाल्याने यात्रेत उत्साह होता. होम प्रदीपनानंतर रात्री एक वाजता भाकणुकीचा कार्यक्रम झाला.
होमहवन विधीसाठी सायंकाळी पाच वाजता बाळीवेस येथील हिरेहब्बू निवासापासून नंदीध्वज मार्गस्थ झाले. सर्व नंदीध्वज जुन्या फौजदार चावडीजवळील पसारे वाड्याजवळ आल्यावर पहिल्या नंदीध्वजास मानाचा नागफणा बांधण्यात आला. अन्य नंदीध्वजांना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अंधारात चकाकत येणारे नंदीध्वज पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. वारे सुटल्याने नंदीध्वज पेलताना नंदीध्वजधारकांना कसरत करावी लागत होती. होम मैदानावर रात्री ११ वाजता नंदीध्वजाचे आगमन झाले.
भाकणूक : पर्जन्यमान साधारण, लाल वस्तू महाग
होमहवनचा विधी पार पडल्यानंतर सिद्धेश्वर मंदिरासमोर वासराच्या भाकणुकीचा कार्यक्रम झाला. वासरासमोर गूळ, गहू, बोरे, सर्व प्रकारचे धान्य, डाळी, फळे ठेवण्यात आली होती. वासराने गूळ आणि गाजर खाले, मलमूत्र विसर्जन केले नाही. अग्नी टेंभा दाखविला तरी वासरू बुजले नाही. यावरून लाल वस्तू महाग होतील. पर्जन्यमान साधारण होईल अाणि सामाजिक शांतता असणार आहे, असे संकेत मिळाल्याचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले.
आज शोभेचे दारूकाम
यात्रेतीलप्रमुख आकर्षण असलेले शोभेचे दारूकाम शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता होम मैदानावर होणार आहे. यात पाच जणांनी सहभाग घेतला असून यंदाच्या यात्रेत नव्या फॅन्सी आयटम्सचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
मंद्रूप : येथील मळसिद्ध यात्रेच्या निमित्ताने मलकारसिद्ध मंदिरापासून नागफणा मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. यात्राउत्सवामुळे गावातील वातावरण अगदी भावोत्कट झाले होते.
३०फूट उंच नागफणा
सुमारे३० फूट उंच नागफणा असतो. सुमारे ७५ ते ८० किलो वजन असते. नागफणा खांदा हनुवटीवर उचलण्यासाठी भाविक एक महिना पूर्व सराव सुरू करतात.